पर्यावरण रक्षणासाठी प्रशासनाचा पुढाकार; तहसीलदार बाळुताई भागवत यांच्या हस्ते वृक्षारोपण
सांगोला | प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सांगोला येथील शासकीय धान्य गोदाम परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात तहसीलदार बाळुताई भागवत यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.
यावेळी प्रांजली गावडे (पुरवठा निरीक्षण अधिकारी), प्रियंका जाधव (पुरवठा निरीक्षक), निकिता पाटील (पुरवठा क्लार्क) तसेच सोनाली जाधव (पुरवठा क्लार्क) उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना तहसीलदार बाळुताई भागवत यांनी वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणासमोर निर्माण झालेल्या आव्हानांकडे लक्ष वेधले. "प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होण्यास मोठी मदत होईल," असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
📌 चौकट : "एक वृक्ष – एक जबाबदारी" हा संदेश देत प्रशासनाने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून हरित सांगोल्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले.


0 Comments