शिरभावी पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा; ५.४१ कोटींची वीज थकबाकी शासनाकडून भरणार
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; ८९ गावांच्या पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा
सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील ८९ गावांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेवरील ५ कोटी ४१ लाख रुपयांच्या वीज थकबाकीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही संपूर्ण थकबाकी शासनाकडून भरून घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली.
स्वर्गीय आबासाहेबांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली शिरभावी योजना गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागाची तहान भागवत आहे. या योजनेमुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करण्याची वेळ टळली असून हजारो नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत आहे.
मात्र, विविध ग्रामपंचायतींकडील थकबाकी, वाढते देखभाल खर्च आणि प्रचंड वीजबिल यामुळे योजनेसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते.
वीज थकबाकीचा प्रश्न गंभीर बनल्याने योजनेचे भवितव्य धोक्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis तसेच पालकमंत्री Jaykumar Gore यांच्याकडे हा विषय प्रभावीपणे मांडण्यात आला. त्यानंतर शासनाने सकारात्मक भूमिका घेत शिरभावी योजनेची ५ कोटी ४१ लाख रुपयांची वीज थकबाकी भरण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे शिरभावी योजना अधिक सक्षमपणे आणि सुरळीतपणे कार्यान्वित राहण्यास मदत होणार असून ८९ गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दीर्घकाळासाठी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. तसेच गावोगावच्या सरपंच,
उपसरपंच, सदस्य आणि नागरिकांनी पाणीपुरवठा योजनेचे योग्य नियोजन करून सर्वांना नियमित पाणी मिळेल यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.


0 Comments