Breaking News

सांगोला तालुक्यात अवकाळी पावसामुळे डाळिंब, पेरू बागांचे नुकसान; त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी - आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला तालुक्यात अवकाळी पावसामुळे डाळिंब, पेरू बागांचे नुकसान;


त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी - आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला, दि. ६ : सांगोला तालुक्यातील जुजारपूर,सोमेवाडी,गौडवाडी,बुद्धेहाळ,जुनोनी,करांडेवाडी,तिप्पेहळ्ळी,कोळा,

ह.मंगेवाडी,गुणापवाडी, हतीद,सावे,सोनंद,चोपडी,नवी लोटेवाडी,किडेबिसरी तसेच सांगोला शहरात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरांची 

पडझड होऊन आर्थिक नुकसान तसेच डाळिंब, पेरू व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले 

असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बागांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व वादळी वारे सुरू असल्याने फळबागांना मोठा फटका बसला आहे. 

विशेषतः डाळिंब आणि पेरू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी फळगळ, फळांना तडे जाणे, डाग पडणे तसेच उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

सांगोला तालुका हा डाळिंब आणि पेरू उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो. हजारो शेतकरी या फळबागांवर अवलंबून असून मोठ्या खर्चातून त्यांनी बागा जोपासल्या आहेत. 

मात्र ऐन उत्पादनाच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

 कृषी व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानाचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी नमूद केले.

सांगोला तालुक्यातील अर्थव्यवस्थेमध्ये डाळिंब आणि पेरू उत्पादनाचा मोठा वाटा असून हजारो शेतकरी या फळबागांवर अवलंबून आहेत. 

त्यामुळे अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments