पहिल्या हंगामातील आंब्यांचा गोडवा मित्रांसाठीच;
शिवणे येथे तानाजी घाडगे यांची अनोखी ‘आंबा पार्टी’
१९७५ च्या एसएससी बॅचच्या मित्रांचा स्नेहमेळावा; जुन्या आठवणींना उजाळा, गप्पा-टप्पा आणि आंब्यांची मेजवानी
सांगोला | प्रतिनिधी शिवणे गावचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांनी आपल्या शेतातील पहिल्याच आंबा हंगामाचा आनंद मित्रांसोबत वाटून घेत
एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. बाजारपेठेऐवजी मैत्रीला प्राधान्य देत त्यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या सन १९७५ च्या एसएससी बॅचमधील वर्गमित्रांसाठी खास ‘आंबा पार्टी’चे आयोजन केले.
सेवानिवृत्तीनंतर शेतीत रमलेल्या घाडगे यांनी डाळिंब, द्राक्षे, ऊस यांसह विविध पिकांमध्ये यशस्वी प्रयोग केले आहेत. यंदा त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांना प्रथमच भरघोस
फळधारणा झाली. या पहिल्या उत्पादनाची विक्री करण्याऐवजी मित्र आणि नातेवाईकांना प्रेमाने आंबे खाऊ घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
शिवणे येथील शेतात आयोजित या स्नेहमेळाव्यात मित्रांनी नैसर्गिकरीत्या पिकलेल्या रसाळ आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
आंब्यांसोबत मित्रांनी आणलेल्या प्रसिद्ध ‘जयभवानी भडंग’ची जोड मिळाल्याने मेजवानीची रंगत आणखी वाढली. आंब्यांचा गोडवा, भडंगचा तिखट-खमंग स्वाद आणि मित्रांच्या जुन्या आठवणींनी वातावरण आनंदमय झाले होते.
शालेय जीवनातील किस्से, वर्गातील गंमती-जमती, शिक्षकांच्या आठवणी आणि एकमेकांवरील चेष्टा-मस्करी यामुळे अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांमध्ये पुन्हा एकदा जुन्या दिवसांचा उत्साह संचारला.
यानंतर सर्व मित्रांनी शिवणेचे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत चहापानाचा आनंद घेतला. त्याचवेळी वरुणराजानेही हलक्या सरींची हजेरी लावल्याने या स्नेहसंमेलनाला निसर्गाचीही साथ लाभली.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी केले असून दीपक चोथे यांनी त्यांना सहकार्य केले. या प्रसंगी नारायण चव्हाण, जब्बार मुलाणी, नंदकुमार ठोंबरे, मोहन माळी, शंकर डोंबे, विलास पाटील (सर) यांच्यासह अनेक वर्गमित्र उपस्थित होते.
वयाच्या उत्तरार्धातही जपलेली मैत्री, शेतीतून मिळालेला आनंद आणि मित्रांसोबत वाटलेला पहिल्या आंबा हंगामाचा गोडवा यामुळे शिवणे येथील हा स्नेहमेळावा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.


0 Comments