Breaking News

दुष्काळमुक्तीच्या लढ्याला नवी दिशा; मंगळवेढ्यात २६ जूनला ३४ वी पाणी संघर्ष परिषद शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आवाहन

दुष्काळमुक्तीच्या लढ्याला नवी दिशा; मंगळवेढ्यात २६ जूनला ३४ वी पाणी संघर्ष परिषद


शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आवाहन

मंगळवेढा (प्रतिनिधी) : कृष्णा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागांच्या पाणी हक्काच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी 

आणि सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी जनआंदोलनाची ताकद एकवटण्याच्या उद्देशाने शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी मंगळवेढा येथे ३४ वी पाणी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली आहे. 

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित या परिषदेत सांगोला, मंगळवेढा व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

दुपारी १ वाजता जोशी मंगल कार्यालय, बायपास रोड, मंगळवेढा येथे होणाऱ्या या परिषदेत कृष्णा खोऱ्यातील दुष्काळी भागांच्या पाणीटंचाईवर सखोल चर्चा होणार आहे.

 टेंभू, म्हैसाळ, ताकारीसह विविध सिंचन योजनांची सद्यस्थिती, जलव्यवस्थापन, जलहक्क, पाणी साठवणूक आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता या विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.

पाणी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रा. शिवाजीराव काळुंगे उपस्थित राहणार असून निमंत्रक वैभव नागनाथ नायकवडी यांची प्रमुख भूमिका राहणार आहे. 

याशिवाय आमदार विक्रमदादा सावंत, आमदार रोहित आर. आर. पाटील, आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी प्रकल्पांचे पाणी अनेक तलाव, नद्या आणि ओढ्यांपर्यंत पोहोचले असले तरी प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी पोटकालव्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.

 तसेच गाव तलाव, पाझर तलाव आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी भरण्यासाठी शासनाने मोठ्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी परिषदेतून जोरकसपणे मांडली जाणार आहे.

राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची कर्जबाजारी स्थिती, वाढत्या आत्महत्या आणि अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 समान पाणी वाटप, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतीमाल व दुधाला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यांसारख्या विषयांवरही परिषदेत ठोस भूमिका मांडली जाणार आहे.

पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिलेल्या पाणी संघर्षाच्या मार्गावर पुढे जात राज्यकर्त्यांना शेतकरीहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी 

ही परिषद महत्त्वाची ठरेल. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाणी हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments