Breaking News

सांगोला नगरपरिषदेचा शेतकऱ्यांसाठी उपक्रम; मोफत कंपोस्ट खताचे वितरण सुरू, लाभ घेण्याचे आवाहन

सांगोला नगरपरिषदेचा शेतकऱ्यांसाठी उपक्रम; मोफत कंपोस्ट खताचे वितरण सुरू, लाभ घेण्याचे आवाहन


सांगोला (प्रतिनिधी) : शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला पर्यावरणपूरक दिशा देत सांगोला नगरपरिषदेने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. 

शहरातून संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले सेंद्रिय कंपोस्ट खत आता तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सांगोला शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात (कचरा डेपो) वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेतून तयार होणारे कंपोस्ट खत जमिनीची सुपीकता वाढविण्यास,

 सेंद्रिय घटकांचे प्रमाण सुधारण्यास आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यास उपयुक्त ठरत आहे. विशेषतः ऊस पिकासाठी हे खत फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे वाहन घेऊन घनकचरा व्यवस्थापन केंद्रात भेट द्यावी. आवश्यकतेनुसार हवे तेवढे खत मोफत नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

मात्र लाभार्थी हा सांगोला तालुक्यातील शेतकरी असणे आवश्यक असून, त्यासाठी ७/१२ उतारा आणि आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments