भावावर तलवारीचे सपासप वार, ज्या जमिनीवरून वाद तिथेच संपवलं, क्रूर खुनाने सोलापूर हादरलं
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या
जुन्या वादातून एका शेतकऱ्याची त्याच्याच सख्ख्या भावांनी आणि त्यांच्या मुलांनी मिळून तलवारीने सपासप वार करत निर्घृण हत्या केली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला असून परिसरात प्रचंड खळबळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून भावाला संपवलं
संजय नागनाथ शिंदे असे हत्या झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. संजय शिंदे आणि त्यांच्या भावांमध्ये गेल्या काही
काळापासून शेतजमिनीवरून वाद सुरू होता. आज सकाळी संजय शिंदे हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून शेताकडे गेले होते.
ते शेतात पोहोचताच आधीच टपून बसलेल्या त्यांच्या सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांना गाठले. तिथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि या वादाचे रुपांतर थेट हल्ल्यात झाले.
भावावर तलवारीचे सपासप वार केले
आरोपींनी आधीच सोबत आणलेल्या धारदार तलवारीने संजय शिंदे यांच्यावर भीषण हल्ला चढवला. त्यांच्यावर शरीराच्या विविध भागांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले.
हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेल्या संजय शिंदे यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
पूर्वनियोजित कट रचून हत्या, मृताच्या मुलाचा गंभीर आरोप
माझ्या वडिलांची हत्या त्यांच्याच सख्ख्या भावांनी आणि पुतण्यांनी पूर्वनियोजित कट रचून केली आहे.
शेतजमिनीच्या वादातूनच त्यांनी वडिलांवर तलवारीने हल्ला करून त्यांना जागीच संपवले, असा गंभीर आरोप मृताच्या मुलाने केला आहे.
पोलीस घटनास्थळी, तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने कामती खुर्द येथील घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
संजय शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
गावात कमालीचा तणाव
संजय शिंदे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. सख्ख्या भावांनीच भावाचा काटा काढल्यामुळे कामती खुर्द आणि आसपासच्या परिसरात सध्या कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.


0 Comments