सांगोल्यात ज्वारीच्या शेतात गांजाची शेती उघड; ८ किलोहून अधिक गांजा जप्त
सांगोला, प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील घेरडी येथील दिवाणवस्ती परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ज्वारीच्या पिकालगत लावलेली गांजाची शेती उघडकीस आणली.
या कारवाईत सुमारे ८ किलो ३४२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत ४ लाख १७ हजार १०० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण रामचंद्र गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी घेरडी येथील दिवाणवस्ती परिसरातील बाजीराव संपत यमगर (वय ५०) यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि
मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घेरडी येथील शेतगट क्रमांक १०८९ मध्ये ही कारवाई करण्यात आली.
आरोपीने ज्वारीच्या पिकाजवळ बेकायदेशीररीत्या गांजाची झाडे लावल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे सहा फूट उंचीची गांजाची झाडे मुळासकट उपटून जप्त केली.
तसेच गांजाची पाने स्वतंत्रपणे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये साठवून ठेवलेली आढळून आली.
जप्त केलेल्या गांजामध्ये झाडे, पाने आणि देठांचा समावेश असून त्याचे एकूण वजन ८ किलो ३४२ ग्रॅम इतके आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत असून, गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी केली आहे.
या कारवाईमुळे सांगोला तालुक्यातील बेकायदेशीर अमली पदार्थांच्या विरोधातील पोलिसांच्या मोहिमेला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.


0 Comments