Breaking News

सांगोला आगारासाठी १० ‘जिजाऊ’ बसांची मागणी; शहीद अशोक कामटे संघटनेचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

सांगोला आगारासाठी १० ‘जिजाऊ’ बसांची मागणी; शहीद अशोक कामटे संघटनेचे परिवहन मंत्र्यांना निवेदन


सांगोला | प्रतिनिधी सांगोला येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने सांगोला एसटी आगारातील बसांची अपुरी संख्या आणि वाढत्या तांत्रिक बिघाडांच्या पार्श्वभूमीवर 

आगाराला तातडीने १० नवीन ‘जिजाऊ’ बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, सांगोला तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील विस्तीर्ण ग्रामीण भाग असलेला तालुका असून येथील एसटी सेवांवर हजारो प्रवासी आणि विद्यार्थी अवलंबून आहेत. 

सध्या सांगोला आगारात एकूण ५८ बस उपलब्ध असल्या, तरी त्यापैकी अनेक बस जुन्या आणि कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे बस वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले असून अनेक ग्रामीण फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.

विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा संघटनेने मांडला आहे. तसेच लांब पल्ल्याच्या आणि मध्यम अंतराच्या बससेवा अचानक रद्द होणे किंवा उशिराने सुटणे, यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यातून पुणे, मुंबई, हैदराबाद आणि कोल्हापूरसारख्या प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुरेशा बससेवा उपलब्ध नसल्याने बाहेरील आगारांच्या बसांवर अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे, जुन्या बस स्क्रॅपमध्ये जात असल्याने आगारातील बससंख्या आणखी कमी होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या, ग्रामीण भागातील वाहतूक गरज आणि विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सांगोला आगाराला तातडीने किमान १० नवीन ‘जिजाऊ’ बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.

या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या महाव्यवस्थापकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. संघटनेने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments