Breaking News

३४१ रक्तदात्यांचा विक्रम; वृक्षदानातून पर्यावरणाचा संदेश गुंडादादा खटकाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात समाजसेवेचा लोकोत्सव

३४१ रक्तदात्यांचा विक्रम; वृक्षदानातून पर्यावरणाचा संदेश गुंडादादा खटकाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात समाजसेवेचा लोकोत्सव


सांगोला | प्रतिनिधी वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे,



याचे प्रेरणादायी उदाहरण सांगोला तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा युवा नेते दीपक उर्फ ‘गुंडादादा’ खटकाळे यांनी घालून दिले.

 त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान, वृक्षारोपण, वृक्षदान आणि स्नेहभोजन अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरात तब्बल ३४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी सहभाग नोंदविला.

 विशेष म्हणजे ११ महिलांनीही रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. युवकांच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाची चर्चा रंगली.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रेरणेने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आशीर्वादाने हा उपक्रम पार पडला.

यावेळी सांगोला शहरातील एस.टी. स्टँड परिसरातील डिव्हायडर आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 अनेक मान्यवरांनी शाल, फेटे आणि पुष्पगुच्छांऐवजी वृक्ष भेट देऊन गुंडादादा खटकाळे यांचा सन्मान केला. त्यामुळे ‘वृक्षदान’ हा उपक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

“गुंडादादा युवकांच्या गळ्यातील ताईत” – आमदार शहाजीबापू पाटील

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, “गुंडादादा खटकाळे हे समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते आहेत.

 युवकांना एकत्र करून रक्तदान, वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची त्यांची तळमळ प्रेरणादायी आहे. आज ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “वाढदिवसानिमित्त समाजाला काहीतरी देण्याचा संदेश गुंडादादांनी दिला आहे. रक्तदानातून जीवनदान आणि वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी राहत आहे.”

रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. सोमेश यावलकर यांच्या रेडणी येथील ब्लड बँकेच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, उपनगराध्यक्ष नितीनभाऊ इंगोले, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे,

 पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, युवा सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अडीच ते तीन हजार युवक व नागरिकांनी उपस्थित राहून गुंडादादा खटकाळे यांच्यावरील प्रेम आणि विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी केले, तर प्रा. संजय देशमुख यांनी आभार मानले. रक्तदान, वृक्षदान आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा अभिष्टचिंतन सोहळा सांगोला तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments