Breaking News

रक्ताचं पाणी करून वाढवलं; शेवटी बापालाच भीक मागण्याची वेळ वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांविरोधात मंद्रुप पोलिसांचा गुन्हा दाखल

रक्ताचं पाणी करून वाढवलं; शेवटी बापालाच भीक मागण्याची वेळ


वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांविरोधात मंद्रुप पोलिसांचा गुन्हा दाखल

सोलापूर प्रतिनिधी : ज्या बापाने आयुष्यभर कष्ट करून मुलांना वाढवलं, शिकवलं आणि स्वतःची शेती त्यांच्या नावावर केली, 

त्याच वृद्ध बापाला अखेर गावोगावी भीक मागण्याची वेळ आल्याची हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. 

या अमानुष प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून मंद्रुप पोलिसांनी संबंधित दोन मुलांविरोधात थेट गुन्हा दाखल केला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील पांडुरंग बाबुराव गुंड (वय ८०) यांनी दि. २० मे २०२६ रोजी मंद्रुप पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

आपल्या पोटच्या मुलांनीच वृद्धापकाळात उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग गुंड यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट करत 

शेतजमीन त्यांच्या नावावर करून दिली. मात्र जमीन ताब्यात घेतल्यानंतर मुलांनीच वडिलांकडे दुर्लक्ष सुरू केले. 

सन २०२४ पासून दोन्ही मुलांनी मिळून वडिलांना अन्न, औषधोपचार व मूलभूत गरजांपासून वंचित ठेवल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, वृद्ध पांडुरंग गुंड हे गंभीर आजारी असतानाही मुलांनी त्यांच्या उपचारासाठी कोणतीही मदत केली नाही.

 परिणामी, आज त्यांच्यावर गावात फिरून लोकांकडे हात पसरून पोट भरण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, “माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन आणि कल्याण कायदा” अंतर्गत वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे हे मुलांचे कायदेशीर कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

या कायद्याचे उल्लंघन करून वृद्ध वडिलांचा छळ केल्याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत असून, वृद्ध बापाला रस्त्यावर आणणाऱ्या या कृतघ्न मुलांवर कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments