अनकढाळ टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप; ‘एन्ट्री वसुली’च्या आरोपांवर कारवाईची मागणी
सांगोला तालुक्यातील रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील अनकढाळ टोल नाक्यावर वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत.
काही वाहनांना अडवून चौकशी केली जाते, कागदपत्रांच्या नावाखाली वेळखाऊ तपासणी होते
तसेच कथित ‘एन्ट्री वसुली’सारख्या प्रकारांबाबत चर्चा सुरू असल्याने चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, नियमांची अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली अनावश्यक अडवणूक केली जाते.
त्यामुळे प्रवासी आणि चालक दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो.
दिवसभर महामार्गावर कष्ट करणाऱ्या चालकांना या प्रकारांमुळे मानसिक तणावासोबतच आर्थिक फटकाही बसत असल्याचा आरोप होत आहे.
सध्या परिसरात तापमान 42–43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, भर उन्हात तपासणीसाठी रस्त्यावर उभे राहावे लागते,
याबाबतही वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक वाहनांना विशेषतः अडवले जात असल्याचा दावा काही चालकांनी केला आहे.
या प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


0 Comments