शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन खरेदी प्रकरण चर्चेत; रेखांकन बदलल्याने वाढीव मोबदल्याचा डाव फसला?
सोलापूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी झाल्याचे समोर आले
असून या व्यवहारांमुळे राजकीय, प्रशासकीय व औद्योगिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे महामार्गाचे रेखांकन बदलल्याने संभाव्य वाढीव मोबदल्याचा डाव फसल्याची चर्चा रंगली आहे.
महामार्ग कळमण हद्दीतून जाणार असल्याची माहिती आधीच काही बड्या व्यक्तींना मिळाल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात
जमीन खरेदी केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. यामध्ये काही राजकीय नेते, अधिकारी तसेच उद्योगपतींचा सहभाग असल्याची चर्चा आहे.
माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी आपल्या पत्नी रूपमती यांच्या नावे विविध गट क्रमांकांमध्ये जमीन खरेदी केल्याची नोंद
सातबारा उताऱ्यांवरून समोर आली आहे. तसेच काही जमिनी उद्योगपती व इतर व्यक्तींशी भागीदारीत घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, कळमण परिसरात डिंपल मनोज ओसवाल व मनोज रमेशचंद्र ओसवाल यांच्या नावेही मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आली आहे.
मात्र, ओसवाल हे अधिकारी आहेत की उद्योगपती, याबाबत स्थानिक पातळीवर संभ्रम आणि चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, साळुंखे-पाटील, ओसवाल आणि लोढा या संबंधितांनी एकाच गटातील जमीन भागीदारीत खरेदी केल्याने या व्यवहारामागे ‘मलिदा लाटण्याचे’
कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही जमिनीत फळबागा लागवड करून भविष्यात अधिक मोबदला मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे.
मात्र, महामार्गाचे रेखांकन बदलल्याने या सर्व योजनांवर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या मार्गाची माहिती आधीच संबंधितांना कशी मिळाली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमी दरात जमीन विकावी लागते, तर काही प्रभावशाली व्यक्ती मात्र याचा लाभ घेतात, असा आरोपही करण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना माजी आमदार दीपक साळुंखे यांनी, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी कुठेही जमीन घेऊ शकतो. कुणी कसा अर्थ लावायचा तो त्यांनी ठरवावा,” असे स्पष्ट केले आहे.


0 Comments