Breaking News

श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर : दौरा संपताच माढा, सोलापूर शिवसेना कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय

श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर : दौरा संपताच माढा, सोलापूर शिवसेना कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय


शिवसेना पक्षसंघटना वाढीच्या दृष्टीने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला. डॉ. शिंदे यांनी सोमवारी सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

त्यात विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रार आल्यानंतर खासदार शिंदे यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मोठा झटका मानला जात आहे.

शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने काढण्यात आलेल्या पत्रात सोलापूर (Solapur) आणि माढा शिवसेना बरखास्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

 त्याबाबत पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दगडू सपकाळ, सहसंपर्कप्रमुख हनुमंत जगदाळे, सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख खासदार धैर्यशील माने, माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांनाही याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे.

पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेचे (Shivsena) मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना (जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख) कार्यकरणी बरखास्त करण्यात येत आहे.

लवकरच सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख शिवसेना,

 युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमणुका हे संपर्कप्रमुखाचा अहवाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात येतील.

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत सर्व शिवसैनिकांनी जोमाने काम करायचे आहे. तसेच या मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्या शिवसैनिकांची नोंद पक्षाकडून घेतली जाईल. त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना पद दिले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

सोलापूर दौऱ्यात माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान पदाधिकाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. थेट शहाजीबापू पाटील यांच्यापासून जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि अमोल शिंदे यांच्यापर्यंत त्यांच्याच समोर पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. 

खासदार शिंदे यांनी त्या शांतपणे ऐकून घेत दुसऱ्याच दिवशी ॲक्शन मोडवर येत दोन्ही मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्वच आघाड्यांची कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

श्रीकांत शिंदेंसमोर काय तक्रारी झाल्या होत्या?

करमाळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याविरोधात आरोप करत चुकीच्या पद्धतीने निवडी झाल्याचे सांगितले. 

एका पदाधिकाऱ्यांने तर चिवटे यांचे नाव घेत 'तुम्ही पद घ्या, घरी बसा, काम करू नका' असे सांगत जिल्हाप्रमुखपदासाठी आपणही इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते.

सांगोल्याच्या शहरप्रमुखाने तर थेट शहाजीबापू पाटलांवर हल्ला चढवताना एबी फार्म माझ्याकडे दिले. मात्र, मी सांगेन त्याला एबी फार्म द्यायचा, असे फर्मान शहाजीबापूंनी फोन करून काढल्याचे त्यांनी सांगितले.

 माझे पद प्रत्येक आठवड्याला बदलते, त्यामुळे मी कोणत्या पदावर काम करते, हे मलाच कळत नाही, अशी खंत पद्मजा इंगोले यांनी मांडली होती.

मी सोलापूर शहराचा रहिवासी, पण मला करमाळा, माळशिरसची जबाबदारी देण्यात आली आहे. मी कसं काम करायचं. मी शहरप्रमुखपदाची जबाबदारी मागतोय, पण मिळत नाही, अशी खंत नगरसेवक प्रियदर्शन साठे 

यांनी बोलून दाखवली. या सर्वांवर माढ्याचे संजय कोकाटे यांनी पक्षात उदंड पदाधिकारी झाल्याचे सांगत आता काहींना सक्तीच्या विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.

Post a Comment

0 Comments