बायपासवर ठिणगीने धगधगला कंटेनर! दोन लाखांचे कॅरेट जळाले; वेळीच आगीवर नियंत्रण सांगोला तालुक्यातील घटना
सांगोला, प्रतिनिधी : सांगोला-चिंचोली बायपास रोडवर सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत कॅरेटने
भरलेला कंटेनर पेट घेतल्याने सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज येथून एमएच-१२ पीक्यू ९९५८ क्रमांकाचा कंटेनर रिकामे फळ-भाजीपाला कॅरेट घेऊन सांगोल्याकडे निघाला होता.
सांगोला-चिंचोली बायपासवर पोहोचताच रस्त्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारा चालकाच्या लक्षात न आल्याने त्या कंटेनरला अडकून तुटल्या. याचवेळी उडालेल्या ठिणगीने कंटेनरने पेट घेतला.
क्षणातच आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ कंटेनरमधून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला.
घटनेची माहिती मिळताच सांगोला नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक नागरिक, कामगार आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने काही कॅरेट बाहेर काढण्यात यश आले.
या आगीत अंदाजे ९ किलोचे १,८५४ आणि २० किलोचे ७३७ रिकामे कॅरेट जळून खाक झाले असून कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, विजेच्या तारा तुटल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला.
➡️ सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, बायपासवरील विजेच्या तारा आणि सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


0 Comments