सांगोला तालुक्यासाठी दिलासा! माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू–म्हैसाळ योजनेला गती
आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश शेतकऱ्यांना दिलासा
सांगोला : तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यासाठी दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभू–म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत माण नदीत उन्हाळी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संदर्भात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की,
सांगोला तालुक्यातील क्रमांक ४ व ५ फाट्यामधूनही लवकरच आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी पाणीउचल केंद्रांची तपासणी, कालव्यांची दुरुस्ती, गळती रोखण्याच्या उपाययोजना आणि पाणीवाहिन्यांची देखभाल अंतिम टप्प्यात आली आहे.
माण नदीत पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांतील विहिरी, बोअरवेल्स आणि इतर पाणीस्रोतांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
परिणामी खरीपपूर्व शेतीकामांना गती मिळणार असून जनावरांच्या पाण्याची टंचाईही कमी होईल. विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, पाणीवाटपात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक सूचना दिल्या आहेत. पाण्याचे समतोल व पारदर्शक वितरण, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे
आणि अनधिकृत पाणीउचल रोखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनासारख्या पाण्याची बचत करणाऱ्या आधुनिक पद्धतींचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टेंभू–म्हैसाळ योजनेद्वारे सांगोला तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, अशा उन्हाळी आवर्तनांमुळे या योजनेचा लाभ थेट
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. आगामी काळात पाणीसाठ्याच्या स्थितीनुसार आणखी आवर्तनांचे नियोजन करण्याचे संकेतही बैठकीत देण्यात आले.
या बैठकीत सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला. तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन त्यांनी उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


0 Comments