माढा लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाईवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा लोकसभेत प्रश्न
प्रतिनिधी /माढा लोकसभा मतदारसंघातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेत आवाज उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
मतदारसंघातील रखडलेले जलजीवन मिशनची कामे व दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून,तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
मतदारसंघात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करत, ही कामे अद्याप अपूर्ण का आहेत, ते कधी पूर्ण होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकसभेतील चर्चेदरम्यान बोलताना खा.मोहिते-पाटील यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव मांडले.
अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळे शेती आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे सांगत, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी माढा लोकसभा मतदारसंघाला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
भविष्यातील दुष्काळ टाळण्यासाठी केंद्र सरकारकडे नेमका कोणता कृती आराखडा आहे, तसेच टंचाईग्रस्त भागांना प्राधान्य कधी दिले जाणार, याबाबतही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
माढा मतदारसंघातील नागरिकांना पाणीटंचाई पासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी यावेळी केली


0 Comments