Breaking News

मोठी प्रशासनिक बदली “सोलापूरला नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस; कुमार आशीर्वाद नागपूरकडे”

मोठी प्रशासनिक बदली “सोलापूरला नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस; कुमार आशीर्वाद नागपूरकडे”


सोलापूर | प्रतिनिधी : राज्याच्या प्रशासनात महत्त्वाच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या असून, सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर आता कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 विद्यमान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केले.

सुमारे पावणेतीन वर्षे सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करताना कुमार आशीर्वाद यांनी प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन दिले. त्यांच्या कार्यकाळात आषाढी वारीचे यशस्वी नियोजन, 

सोलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावून विमानसेवा सुरू करणे, तसेच सीना नदीच्या महापुराच्या संकटाचा संवेदनशीलतेने सामना करणे ही विशेष उल्लेखनीय कामगिरी ठरली.

याशिवाय, आयटी पार्क उभारणीसाठी त्यांनी घेतलेले पुढाकार, प्रशासनात आणलेली शिस्त आणि पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला अंतिम टप्प्यात पोहोचवणे या बाबीही त्यांच्या कार्यकाळातील ठळक वैशिष्ट्ये मानली जात आहेत.

दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले कार्तिकेयन एस हे 2020 बॅचचे भाप्रसे (IAS) अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

 तसेच ते सनदी लेखापाल (Chartered Accountant) असून, सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

आता त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार असून, आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments