“कागदावर नव्हे, वर्गात निकाल दिसला पाहिजे!”
– पदभार स्वीकारताच चेतनसिंह सावंत यांचा शिक्षण विभागाला कडक इशारा
सांगोला (प्रतिनिधी):जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कामाला लागावे,
असा कडक इशारा देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी पदभार स्वीकारताच
शिक्षण विभागाला स्पष्ट दिशा दिली. “फक्त कागदोपत्री काम नको, प्रत्यक्ष निकाल दिसला पाहिजे,” अशा ठाम शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
प्राथमिक शाळांचा पट वाढवणे, शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक
गुणवत्ता उंचावणे आणि शिक्षण क्षेत्रात नव्या संकल्पना राबवणे यावर भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.
आदर्श शाळा, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
तसेच शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात नावलौकिक मिळवेल असा शिक्षण विभाग उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत
त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेत नतमस्तक होत कामाची सुरुवात केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पंचायत समिती सभापती पुनम इंगवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पदभार स्विकारल्यानंतर सावंत यांनी तत्काळ शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विभागाची माहिती सादर केली.
यावेळी सावंत यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
📦 चौकट
आरोग्य सेवांवरही सावंत यांचा फोकस; अचानक भेटीत दिले कडक निर्देश
शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवांवरही लक्ष केंद्रित करत चेतनसिंह सावंत यांनी वाढेगाव व आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या.
औषधसाठा, तपासणी यंत्रणा आणि रुग्णसेवेची पाहणी करत त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश दिले.
“कोणत्याही रुग्णाला उपचाराविना परत पाठवू नका,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी ग्रामीण भागातील
आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता, सुविधा आणि सेवा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आला.






0 Comments