भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना निवेदन सादर
सांगोला : भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांना निवेदन सादर केले.
या करारामुळे भारतीय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अमेरिकेतील कृषी उत्पादनांना शून्य टक्के आयात शुल्क (0% import duty) लागू केल्यास स्वस्त विदेशी माल मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारपेठेत दाखल होईल.
यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या किंमती घसरतील आणि त्यांना योग्य बाजारभाव मिळणे कठीण होईल.
भारतामध्ये बहुतांश शेतकरी लहान व अल्पभूधारक असून त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान व पुरेशी सरकारी मदत उपलब्ध नाही.
अशा परिस्थितीत अमेरिकेतील अनुदानित आणि मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करणे भारतीय शेतकऱ्यांसाठी अशक्य ठरेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच, या करारामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) व्यवस्था आणि किमान आधारभूत किंमत (MSP) यांची उपयुक्तता कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
व्यापारी स्थानिक उत्पादनांऐवजी आयातीत मालाला प्राधान्य देतील, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
दुग्धव्यवसायावरही या कराराचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, स्वस्त आयातीत दूध व दुग्धजन्य पदार्थांमुळे
गावपातळीवरील उत्पादकांचे उत्पन्न कोसळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था डगमगेल, असा इशाराही देण्यात आला.
याशिवाय, या करारामुळे कृषी क्षेत्रात मोठ्या खाजगी कंपन्यांचे वर्चस्व वाढण्याचा धोका असून,
भारतीय शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीवर मजूर बनण्याची वेळ येऊ शकते, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
वरील सर्व बाबींचा विचार करता, हा करार “शेतकरीविरोधी” असून देशाच्या आत्मनिर्भरतेला
बाधा आणणारा असल्याचा ठाम आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष अजित चव्हाण, शहर युवक अध्यक्ष फिरोज मणेरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments