Breaking News

भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा, नव्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष

भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा  तडकाफडकी राजीनामा, नव्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष


माढा लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षात (भाजप) संघटनात्मक बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 सोलापूर पश्चिम विभागाचे भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

केदार-सावंत यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांतील यशानंतर पक्षात संघटनात्मक पुनर्रचना सुरू असल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत आहे.

केदार-सावंत हे सोलापूर जिल्हा परिषदेत निवडून आले असून त्यांना शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वानुसार त्यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सभापतीपदी निवड होताच त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, त्यांच्या पत्नीही सांगोला नगरपरिषदेवर निवडून आल्या असून पती-पत्नी दोघांनाही पक्षाकडून महत्त्वाची पदे मिळाल्याने ही बाबही चर्चेत आहे.

आता सोलापूर पश्चिम विभागाच्या नव्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली आहे. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे (करमाळा)

 आणि प्रणव परिचारक (पंढरपूर) हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. परिचारक यांनी वरिष्ठ नेत्यांकडे इच्छाही व्यक्त केल्याची माहिती आहे.

 मात्र, पंढरपूर हा सोलापूर पूर्व विभागात येत असल्याने त्यांची निवड होईल का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे गणेश चिवटे यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे.

गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या वीट जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या असून त्या 

देखील सभापतीपदाच्या शर्यतीत होत्या. यापूर्वी त्यांनी भाजयूमोच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.

दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची पसंती कोणाला मिळते आणि पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे आता संपूर्ण माढा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments