Breaking News

सोलापुरात संतापाची लाट! खोट्या HIV अहवालामुळे गर्भवतीचा संसार उद्ध्वस्त; सासरकडून घराबाहेर हकालपट्टी

सोलापुरात संतापाची लाट! खोट्या HIV अहवालामुळे गर्भवतीचा संसार उद्ध्वस्त; सासरकडून घराबाहेर हकालपट्टी


सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकलूज येथील शासकीय आयसीटीसी (ICTC) 

केंद्रातून एका गर्भवती महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

या अहवालामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा भूचाल आला असून पती व सासरच्या मंडळींनी संशय घेत तिला घराबाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर संबंधित महिलेने विविध शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासण्या केल्या. यामध्ये सर्व अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आले. 

एसडीएच सोलापूर, आयसीटीसी केंद्र तसेच हिंदलॅब्स येथे करण्यात आलेल्या HIV-PCR आणि Viral Load चाचण्यांमध्ये “RNA Not Detected” असा निष्कर्ष नोंदवण्यात आला.

दरम्यान, चुकीच्या अहवालामुळे विनाकारण सुरू करण्यात आलेल्या औषधोपचारांचा तिच्या आरोग्यावरही परिणाम झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

 या संपूर्ण प्रकारामुळे आयसीटीसी केंद्राच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. 

येत्या आठ दिवसांत अहवाल सादर होणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, पीडित महिलेला न्याय व नुकसानभरपाई मिळावी, तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी,

 या मागणीसाठी १ मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी दिला आहे.

या प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाबाबत नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments