मराठीचा अभिमान हाच मराठी भाषेचा खरा सन्मान - प्रा.धनाजी चव्हाण सांगोला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
सांगोला (प्रतिनिधी) मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून तो आपला सांस्कृतिक वारसा आहे. आज जगभरात १२ कोटींहून अधिक लोक मराठी बोलतात.
या भाषेचा सार्थ अभिमान बाळगणे, हाच मराठी भाषेचा खरा सन्मान ठरेल असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले.
सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' विशेष व्याख्यानात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,
मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. बबन गायकवाड व प्रा. संतोष लोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, नाटककार 'कुसुमाग्रज' यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुढे बोलताना प्रा.चव्हाण यांनी मराठी ही जगातील १० व्या क्रमांकाची भाषा असून ११२ देशात ती बोलली जाते. ज्ञानभाषेच्या सर्व निकषांवर मराठी जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
असे सांगत संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ यांच्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'राज्यव्यवहार कोशा'पर्यंतचा समृद्ध प्रवास व डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.विजय भटकर,डॉ.अनिल काकोडकर
व उद्योग,क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनच जागतिक कीर्ती मिळवल्याचा दाखला देत मराठी केवळ साहित्यापुरते मर्यादित न राहता सूत्रसंचालन,मुद्रितशोधन, जाहिरात, अनुवाद,आर.जे,अनुदिनी यासारख्या आधुनिक क्षेत्रात
मराठीच्या उपयोजनातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अरुण बंडगर व भगवंत कोळी यांनी आपल्या मनोगतातून मराठीची थोरवी विषद केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.सुरेश भोसले यांनी कवी 'कुसुमाग्रज' यांच्या अतुलनीय साहित्य योगदानाची माहिती देत.मराठी संस्कृतीचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.
व तंत्रज्ञान क्षेत्रातही मराठीचा वापर वाढवण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.बबन गायकवाड यांनी केले. नंदा गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन सेजल कवठेकर यांनी केले तर आभार प्रा.संतोष लोंढे यांनी मानले.


0 Comments