सांगोला विद्यामंदिर येथे पेपर चोरीनंतरही दहावीचा भूगोल पेपर वेळेवरच; पुणे बोर्डाचा स्पष्ट निर्णय
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या भूगोल विषयाच्या सुमारे ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात चिंता व्यक्त केली जात होती.
या घटनेमुळे उद्याचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला जाणार का, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत पुणे एसएससी बोर्डाने मोठा निर्णय जाहीर केला आहे.
पुणे विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, दहावीचा भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगता शांतपणे परीक्षा द्यावी,
असे आवाहन त्यांनी केले. पेपर चोरीची घटना समोर आल्यानंतर तातडीने अहवाल मागवून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून परीक्षेच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोरी गेलेल्या प्रश्नपत्रिका बाहेर लीक झाल्या असतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जर पेपर फुटल्याचे समोर आले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने कारवाई केली आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने विद्यार्थ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले असून परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


0 Comments