Breaking News

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने


१३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

सोलापूर: मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांवर होत असलेल्या परिणामाची गंभीर घटना सोलापूर  जिल्ह्यात समोर आली आहे.

 मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात 13 वर्षांच्या मुलाने मोबाईल वापरू दिला नाही म्हणून राहत्या घरी गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 1 मार्च रोजी सायंकाळी घडली.

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाचे वडील शेतकरी आहेत. 1 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुलाने घरच्यांकडे मोबाईल मागितला. मात्र अभ्यासावर लक्ष दे, मोबाईलचा वापर कमी कर, 

असे कुटुंबीयांनी त्याला सांगितले. यावरून घरात किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात मुलगा आतल्या खोलीत गेला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला.

बराच वेळ मुलगा बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मुलाने पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

 त्याला तातडीने खाली उतरवून पेनुर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी मोहोल पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पालकांनी मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments