सोलापूर जिल्ह्यासाठी 29 कोटींचा निधी मंजूर; झेडपी व पंचायत समित्यांना मोठा दिलासा
सोलापूर : जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी केंद्रीय वित्त आयोगाकडून सोलापूर जिल्हा परिषद
आणि दहा पंचायत समित्यांसाठी एकूण 29 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून जिल्ह्यात विविध मूलभूत सुविधांची कामे हाती घेतली जाणार असून ग्रामीण भागातील विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला आहे. यामध्ये 14 कोटी 61 लाख रुपये जिल्हा परिषदेला, तर 14 कोटी 61 लाख रुपये पंचायत समित्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सत्ता आल्यानंतर दिलेले आश्वासन पूर्ण करत पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळत हा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून पाणीपुरवठा, स्वच्छता, गावातील अंतर्गत गटारी, रस्ते, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र दुरुस्ती, स्मशानभूमी, जोडरस्ते आणि पथदिवे अशा विविध विकासकामांना चालना मिळणार आहे.
तालुकानिहाय निधी वितरण पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट – 1 कोटी 29 लाख
बार्शी – 1 कोटी 23 लाख
करमाळा – 1 कोटी 25 लाख
माळशिरस – 1 कोटी 93 लाख
मोहोळ – 1 कोटी 22 लाख
मंगळवेढा – 1 कोटी 83 लाख
उत्तर सोलापूर – 65 लाख 96 हजार
पंढरपूर – 1 कोटी 67 लाख
सांगोला – 1 कोटी 47 लाख
दक्षिण सोलापूर – 1 कोटी 34 लाख
एकूण 14 कोटी 61 लाख रुपयांचा निधी पंचायत समित्यांना देण्यात येणार असून उर्वरित निधी जिल्हा परिषदेकडून विविध विकासकामांसाठी वापरला जाणार आहे.
या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


0 Comments