नवी लोटेवाडी येथे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या प्रकरणी पोलिसांनी
मोठी कारवाई करत ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सांगोला :- सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील नवी लोटेवाडी येथे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या प्रकरणी
पोलिसांनी मोठी कारवाई करत ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मुख्य आरोपीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अतुल खराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बंटी कांबळे (रा. महुद, ता. सांगोला) व त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध बीएनएस कलम 303(2), 3(5) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास नवी लोटेवाडी येथील पाटील वस्तीवरून माण नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी हा अशोक लेलंड कंपनीच्या पांढऱ्या
रंगाच्या विनानंबर चारचाकी वाहनातून शासनाची परवानगी व रॉयल्टी न भरता बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असता त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळली.
जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे ५ लाख रुपये असून वाळूची किंमत ७ हजार रुपये आहे. असा एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपीचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. तसेच वाहन चालक बंटी कांबळे याने वाहन पोलीस ठाण्यात आणत असताना अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजगे करीत आहेत.


0 Comments