खळबळजनक..माझ्यावर टाकलेली धाड कटकारस्थानातून: शहाजी पाटील;
पालकमंत्री अन् माजी आमदाराबाबत माेठे वक्तव्य, अश्रू अनावर !
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना असताना मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी धाड पडली.
ही कारवाई खेदजनक आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या कटकारस्थानातून ही धाड टाकण्यात आली, असा आरोप शहाजी पाटील यांनी केला.
पाटील म्हणाले, माझ्याच पक्षाचे सरकार असताना मला बदनाम केले जात आहे, हे बरोबर नाही. मी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सविस्तरपणे बोलणार आहे. मी लढणारा कार्यकर्ता आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ३०) रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चार ठिकाणी छापेमारी केली.
माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासह शहर विकास आघाडीचे कार्यालय,
माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांचे घर आणि सोने व्यापारी अनिल क्षीरसागर यांच्या निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली.
तीन ठिकाणी काहीही संशयास्पद आढळले नाही, तर अनिल क्षीरसागर यांच्या घरी साडे २८ लाखांची रोकड पोलिसांना
सापडल्याची माहिती मिळाली आहे. रोकड जप्त करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
रविवारी (ता. ३०) दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.
त्यानंतर सायंकाळी जय भवानी चौकात शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार सभा झाली.
या सभेतील टीका-टिप्पणी आणि वाढत्या राजकीय तापमानामुळे शहरात एकच चर्चा रंगली असतानाच रात्री अचानक ही धाड टाकण्यात आली.
सांगोल्यातील काही कार्यालय व घरावरील छापा गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकला होता.
कारवाई करताना फ्लायिंग स्क्वाड सोबत देण्याबाबत पोलिस विभागाच्या मागणीनुसार निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे पथक त्यांच्यासोबत दिले होते.
अनिल क्षीरसागर यांची पोलिसांनी जप्त केलेली रोकड पुढील कारवाईसाठी कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
संबंधित विभागाकडून चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे
- सैपन नदाफ, निवडणूक निर्णय अधिकारी, सांगोला.
२८ लाखांची रोकड जप्त
सोने व्यापारी अनिल क्षीरसागर यांच्या घरी साडे २८ लाखांची रोकड मिळाली आहे.
परंतु ती व्यापारासंबंधित असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले असल्याचे समजते. पुढील कारवाईसाठी रोकड जप्त केली आहे.


0 Comments