सांगोला तालुक्यात 'अतिसार थांबवा' राज्यस्तरीय मोहीम
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : पावसाळ्यात दूषित पाणी, दूषित अन्नपदार्थांच्या सेवनामुळे रोगराई निर्माण होते. या रोगराईमुळे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त वाढते. या सगळ्यात लहान मुलांना कायमच अतिसार होण्याचे प्रमाण जास्त असते.
हीच बाब लक्षात घेत तालुक्यांमध्ये आरोग्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत अतिसार थांबवा ही राज्यस्तरीय मोहीम 16 जून ते 31 जुलै या कालावधीत तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे.
सदर मोहिमेचे मार्गदर्शन तालुका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. संदीप देवकते यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
अतिसार थांबवा या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट उन्हाळा व पावसाळा या संक्रमण काळात नैसर्गिक कारणांनी वाढणार्या अतिसाराच्या संभाव्य घटनांना प्रतिबंध घालणे आहे.
तसेच योग्य उपचार पोहोचविणे हे आहे. यासाठी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून शून्य ते पाच वर्षाखालील बालकांचे सर्वेक्षण ओ.आर.एस. व झिंक गोळ्यांचे वाटप घरोघरी आरोग्य शिक्षण व समुपदेशन करण्यात येत आहे.
मोहीम राबविताना आरोग्य विभाग अधिक जोखमीच्या क्षेत्रांवर तसेच दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
त्यामुळे झोपडपट्ट्या, आरोग्य सेविका नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, वीटभट्टी व स्थलांतरित कामगारांची वस्ती, बेघर मुले व दूषित पाणीपुरवठा असलेली गावे
अशा ठिकाणी छाननी सुरू आहे. वैयक्तिक आणि परिसरातील स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसार पसरविणार्या जंतूचा प्रसार होऊन, अतिसाराची लागण होते. उघड्यावर शौचास बसणे,
उघड्यावरील अन्नपदार्थ सेवन करणे, दैनंदिन जीवनात अशुद्ध पाण्याचा वापर करणे, जेवणाआधी व शौचाच्या नंतर स्वच्छ पाणी व साबणाने हात न धुणे अशा सवयी अतिसाराचा प्रादुर्भाव होण्याकरिता कारणीभूत आहेत.
आरोग्य शिक्षण व उपाययोजना आरोग्य पोषण दिनाद्वारे मातांना अतिसार प्रतिबंधक उपाय, स्तनपानाचे महत्त्व, स्वच्छतेचे नियम, ओ. आर. एस. व झिंकचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अतिसाराच्या उपचाराकरिता ओ. आर. एस.चे घोळ तयार करून,
बालकाला दिल्यास शरीरातील जल शुष्कतेचे प्रमाण कमी होते. तसेच क्षारांची कमतरताही भरून निघते. झिंकची गोळी पंधरा दिवस दिल्यास जुलाबाची वारंवारता कमी होऊन, अतिसार लवकर बरा होतो.
-डॉ. संदीप देवकते, तालुका वैद्यकीय अधिकारीवैयक्तिक आणि परिसरातील स्वच्छता राखावी. उघड्यावर शौचास जाणे टाळावे, उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ खाणे टाळावे, स्वच्छ व उकळून गार केलेलेच पाणी प्यावे,
जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात धुवावेत. उलटी, जुलाब अशी अतिसाराची लक्षणे दिसल्यास, त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
0 Comments