महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव मधील २००६ - ०७ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
१७ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. सर्व विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
निमित्त होते डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, महात्मा फुले विद्यालयातील २००६-०७ एस एस सी बॅचचे स्नेहमेळाव्याचे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा जोतिबा फुले व संस्थापक अध्यक्ष कै.माणिकराव (तात्या) बाबर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.टी.के.काशिद सर,
संस्थासंचालक मा. जाधव सर, शिक्षिका गळवे मॅडम, विद्यार्थी विशाल काळे, नितीन घाटगे, मनिषा उतळे, सुचिता कांबळे, रुपाली बाबर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व गुरुजनांचा शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प, फेटा बांधून सन्मान करण्यात आला.तसेच शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांचा गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले.
सुखी जीवनासाठी वेळ काढून गेट-टुगेदर व्हायलाच पाहिजे तसेच व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या बरोबरच शेतकऱ्यांनी स्वतःला मालक समजणे आवश्यक आहे. कारण शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे. शिक्षणाबरोबर संस्कार ही खुप महत्वाचे आहेत.
आपल्या पाल्याप्रती पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे असे शिक्षकांनी सांगितले. यावेळी काशिद सर, जाधव सर, देवकते सर, किरगत सर, ऐवळे सर,सुतार सर, खंडागळे सर, गळवे मॅडम उपस्थित होते.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच.
म्हणूनच अशा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी शाळेला घड्याळ भेट दिले.
यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रित स्नेहभोजन आस्वाद घेतला.या कार्यक्रमाला बापुसो बोराडे, सुरेश काशिद, सचिन किरगत, नितीन गळवे, नितीन घाटगे, संभाजी बाबर,
विशाल काळे, श्रीदेवी शेंडे, विद्यारानी कोडग, मनिषा उतळे, अरुणा मासाळ, सुचिता कांबळे, रुपाली बाबर, सारिका बाबर, नंदा राजगे हे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विशाल काळे व मनिषा उतळे यांनी केले.
------ चौकट -------
शाळेच्या अभ्यासिकेसाठी ४५ हजार रुपये देणगी
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक वेळ अभ्यास करता यावा यासाठी शाळेने अभ्यासिका बांधकामाचे काम हाती घेतले आहे यासाठी संस्थेने अर्थसहाय्य करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत २००६-०७ बॅचच्या विद्यार्थ्यानी शाळेला ४५ हजार रुपये देणगी दिली व यापुढेही सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे संस्था संचालक जाधव सर, मुख्याध्यापक काशिद सर यांनी आभार मानले.
0 Comments