खळबळजनक टक्कल व्हायरस! तीन दिवसांतच नागरिकांचे पडत आहे टक्कल;
अज्ञात आजाराने ग्रामस्थ हैराण, आरोग्य पथकांकडून सर्वेक्षण सुरू
नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे.
ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे, ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. शेगाव (जि. बुलढाणा) तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील प्रकार उघडकीस आला आहे.
तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणांमुळे केसगळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत.
अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केसगळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे.
हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत. शाम्पूने असा प्रकार घडत असावा,
असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत जिल्हा आरोग्याधिकारी यांना निवेदन देत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही माहिती देण्यात आली आहे..
सर्वेक्षणात आढळले ३० बाधित
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले. त्यामध्ये केसगळतीच्या आजाराने ३० जण बाधित असल्याची माहिती पुढे आली. त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले.
लक्षणानुसार औषधोपचारही सुरू
तीनही गावांतील केसगळतीच्या समस्येबाबतची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात पोहोचले. त्यांनी सर्वेक्षणासोबतच आरोग्यविषयक सल्ला दिला आहे.
लक्षणानुसार औषधोपचारही सुरू केला. तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. – डॉ. दीपाली बाहेकर, तालुका आरोग्याधिकारी, शेगाव,
0 Comments