सांगोला शहरात भुयारी गटार कामाची खोली व चेंबर साठी केले जात असलेले बांधकाम
निकृष्ट दर्जाचे भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करावी : नागरिकांची मागणी..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:-भुयारी गटारी योजनेचे काम पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गासह सर्वच भागांमध्ये खुदाई केली जात आहे.
भुयारी गटारी योजनेचे काम झपाट्याने उरकून घेण्याचा सपाटा सुरू असला तरी, पावसाळ्यात उघड्या गटारी भरून वाहतात मग या भुयारी गटारीतून किती पाणी बसणार असा प्रश्न उपस्थित करत, भुयारी गटारी योजनेसाठी वापरली
जाणारी पाईपची साईज कमी असल्याची चर्चा आहे. सदर कामाची खोली व चेंबर साठी केले जात असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आरोप प्रत्यारोप होत आहेत.
शहरातील सर्व रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे सदर भुयारी गटारी योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
सांगोला शहरातील भुयारी गटारीचा मुद्दा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. अनेकदा सोशल मीडिया वरून यासंदर्भात अनेक जणांनी संताप व्यक्त केल्याचेही अनेकांनी पाहिले आहे. यासह दररोज या विषयांवर वेगवेगळी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहेत.
शहराची लोकसंख्या आणि त्या प्रमाणात वापरात येणारे पाणी याचा विचार करता, सध्या भुयारी गटारी योजनेसाठी वापरण्यात येत असलेल्या पाईप मधून पाणी बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सांगोला शहर व उपनगरात पावसाळ्यात छोट्या मोठ्या गटारी तुडुंब भरून वाहतात यातून पाणी ओसंडून अनेकदा रस्त्यावर आल्याचेही सांगोलकरांनी अनुभवले आहे.
मग या भुयारी गटारी योजनेच्या पाईप मधून हे पाणी वाहून जाणार का असा प्रश्न अनेक जण उपस्थित करताना दिसून येत आहेत. भुयारी गटारी योजनेसाठी चेंबरचे काम केले जात आहे
त्या ठिकाणी बांधकामावर पाणी मारले जात नाही. सिमेंटचा वापर कमी केला जात असल्याची ही तक्रारी आहेत. यासह ज्या दिवशी बांधकाम केले जाते त्याच दिवशी ते बुजवून घेऊन पुढे काम सुरू ठेवले जात आहे.
यामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्याही नागरिक तक्रारी करीत आहेत. सदर योजनेच्या काम लेबर व जेसीबी चालक यांच्या विश्वासावर सुरू असून, कामाची लाईन लेव्हल,
खोदाई मधील उंची याबाबत तपासणीसाठी इंजिनियर उपस्थित राहत नाहीत. परिणामी सदरचे काम रामभरोसे सुरू असल्याबाबत नागरिकांमधून आरोप प्रत्यारोप होत आहेत.
भुयारी गटारी योजनेच्या कामासाठी खुदकामात अनेकांच्या पाण्याच्या लाईन जुन्या गटारीची पाईप यासारख्या अनेक गोष्टीचे नुकसान होत आहे.
परंतु संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करून आपले काम पूर्ण करून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु याचा नाहक त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.
सदरची योजना पूर्णत्वाला गेल्यानंतर पुन्हा शहराच्या नशिबी उघड्या गटारी येऊ नये म्हणजे झालं याबाबत ही नागरिकांमधून चर्चेचा विषय ठरत आहे.
सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरून तसेच गल्लीबोळातून देखील खोदकाम सुरू असल्याने यामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
यामध्ये रस्त्यावरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे सांगोलाकरांचा श्वास कोंडला जात असतानाच, आजारांना निमंत्रण देणारी धूळ वातावरणात भरून राहिल्याने धोका प्रचंड वाढला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर किमान वाहने जाणे इतपत रस्ता सुरू ठेवणे गरजेचे असताना, संबंधित प्रशासकीय अधिकारी कार्यालयामध्ये बसून नियोजन करतात
परंतु याचा नाहक त्रास नागरिकांना होत असल्याची संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुचाकी वाहनावरून ये जा करीत असताना अनेकांना मणक्याचा त्रास जाणवू लागला आहे.
धुळीमुळे अनेकांच्या उद्योग व्यवसायावर परिणाम होत आहेत. शहरामध्ये एक ही चार चाकी वाहन सरळ जात नाही अशी ही परिस्थिती आहे. नागरिकांना सर्दी, खोकल्यापासून दम्यापर्यंत अनेक तक्रारी वाढल्या आहेत.
धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. संबंधित ठेकेदार यांच्याकडून खोदाई केलेल्या कामावरील जमा
होणारी माती व कचरा बाजूला सारून आपले काम उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे परिणामी याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर होत असून,
पालिका प्रशासनाने धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणी मारून घ्यावे आणि सांगोलकरांना धूळ आणि प्रदूषणापासून मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.
शहरात सुरू असलेल्या विकास कामावर नियंत्रण कोणाचे ?, शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था, धुळीमुळे उद्योग व्यवसायावर होणारे परिणाम, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, खोदकामांमध्ये
नागरिकांचे होणारे नुकसान याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत, आजी - माजी व भावी नगरसेवक यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्याने बघून सुद्धा बघ्याची भूमिका घेऊन गप्प आहेत.
यामध्ये नागरिक व व्यापारी यांचे मोठे हाल होत असून, शहरातून खेड्याकडे चला अशी अवस्था येथील व्यापाऱ्यांची व नागरिकांची झाली आहे. याकडे कोण लक्ष देणार आहे की नाही असा प्रश्न शहरवासीय व व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
0 Comments