खळबळजनक! वाळू गाड्यांकडे दुर्लक्ष करा, गाड्या चालू राहू द्या, आपलेच आहेत
सगळे; पालकमंत्री असताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याचे विखे-पाटलांचे वक्तव्य
आता मुंबईला जाण्यासाठी इंदापूरऐवजी अहमदनगरला वळसा घालावा लागणार
सोलापूरचे तत्कालिन पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळुच्या गाड्या-क्रशरकडे दुर्लक्ष करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याची थेट कबुलीच माढ्यातील टेंभुर्णीमध्ये भर कार्यक्रमात दिली.
ते म्हणाले, ‘येथे स्टेजवर कुमार आशीर्वाद असले तरी शेवटी त्यांना मागे मी म्हटलं होतं, दुर्लक्ष करा याकडे. गाड्या चालु राहु द्या. काय फरक पडत नाही. आपलेच लोकं आहेत सगळे…’ मंत्री विखे पाटील अशी कबुली देत असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्मितहास्य केले.
‘सोलापूरमध्ये वाळूच्या ट्रक आहेत… क्रशरच्या गाड्या आहेत, असेही विखे पाटलांनी विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बघून सांगितले. यावर गोरे यांनी सावध करताच विखे पाटलांनी वाळूवर भाष्य आवरते घेतले.
त्यानंतर कार्यक्रम संपताच पत्रकारांनी विचारताच सारवासारव केली. २०२२-२३ मध्ये विखे-पाटील हे १ वर्षे, १ महिना सोलापूरचे पालकमंत्री होते.
यावेळी मंचावर माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, माजी आमदार बबनराव शिंदे, राम सातपुते आदी उपस्थित होते.
गंमतीने बोललो….
सगळ्या गोष्टी गांभिर्याने घेऊ नका. सगळ्या गोष्टी गंमतीने बोललो माणूस. वाळू धोरणाच्या बाबतीत अतिशय कडक आहोत. अधिकाऱ्यांवरही कारवाई केली आहे.-राधाकृष्ण विखे-पाटील, सोलापूरचे तत्कालिन पालकमंत्री.
0 Comments