सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. गाडीला कट मारण्याच्या कारणावरून चार जणांची एकास मारहाण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:-गाडीला कट मारण्याच्या कारणावरून आपल्यात झालेली बाचाबाची तू आमच्या वडिलाला का सांगितली. तुला लय माज आला आहे,
असे म्हणून चौघांनी एकास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून चाकूने डोकीत वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथे घडली आहे.
सचिन सुभाष हिप्परकर (रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) हे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलगी आरोही हिला शाळेत सोडण्याकरीता दुचाकीवर जात असताना गावातील
लक्ष्मण बाळू शिंदे व कुंडलिक बाळू शिंदे यांनी फिर्यादी सचिन हिप्परकर यांच्या दुचाकीला कट मारला होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला कट का मारला असे विचारले तेव्हा शिंदे यांनी फिर्यादीशी हुज्जत घातली होती
म्हणून फिर्यादीने घडला प्रकार शिंदे यांचे वडिलांना फोन करून सांगितला. त्यानंतर अकराच्या सुमारास फिर्यादी गावात असताना गावातीलच दादा बाड हे फिर्यादी जवळ आले व त्यांनी सांगितले
की तुला मारण्याकरिता लक्ष्मण शिंदे हा मुले घेऊन येत आहे. तू माझे सोबत चल, उगीच वाद कशाला करायचा असे म्हटल्याने फिर्यादी दादा बाड याचे बरोबर त्याचे घरी गेला.
त्यावेळी तेथे लक्ष्मण बाळू शिंदे, कुंडलिक बाळू शिंदे, कुणाल विजय कांबळे रा. लक्ष्मीनगर दत्ता संजय माने ढाळेवाडी) व कुणाल विजय कांबळे (रा. लक्ष्मीनगर)
हे सर्वजण फिर्यादीस शिवीगाळी करत असताना लक्ष्मण शिंदे याने तू आमच्या वडिलांना काय सांगितले, तुला लय माज आला आहे, तुला बघतोच असे म्हणून
फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कुंडलिक शिंदे व कुणाल कांबळे या दोघांनी पकडून दत्ता माने याने त्याच्या जवळील चाकूने डोक्यात मारून जखमी केले असल्याची घटना घडली आहे.
यावेळी फिर्यादीला सोडविण्यासाठी दादा बाड, देवदत्त गळवे आले व त्यांनाही मुक्का मार लागला आहे.
याबाबत सचिन हिप्परकर यांनी लक्ष्मण शिंदे, कुंडलिक शिंदे, कुणाल कांबळे व दत्ता माने यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
0 Comments