सांगोला तालुक्यात आधुनिक कुस्ती केंद्राची गरज; सुविधांच्या अभावामुळे मल्ल बॅकफूटला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : कुस्ती हा पारंपरिक खेळ आहे. या खेळाची जपणूक करणे आज काळाची गरज बनली आहे.
सांगोला तालुक्यात कुस्तीची आवड असणाऱ्या पैलवानांची संख्या अधिक असली तरी आधुनिक कुस्ती केंद्र नाहीत.
सध्या कुस्तीमध्ये विविध प्रकार आले असल्यामुळे या खेळाची जपणूक करण्यासाठी 'आधुनिक कुस्ती केंद्र' निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये असे कुस्ती प्रकार खेळण्यासाठी सुविधा नसल्यामुळे पैलवान मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
कुस्तीकडे सर्वसामान्यांचा खेळ म्हणून या कुस्तीकडे पाहिले जाते. कुस्ती हा मराठी शब्द कुश्ती या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे.
अनेक शहर व गावांमधून प्राचीन काळापासून हा खेळ खेळायला जात आहे. ग्रामीण भागातील गाव जत्रा किंवा इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये कुस्तीचा खेळ आवर्जून खेळला जात होता.
हा खेळ पूर्वीपासून तांबड्या मातीमध्ये खेळला जात होता. १८९६ मध्ये आधुनिक ऑलिंपिकमध्ये कुस्तीचा समावेश झाला तेव्हापासून कुस्तीचे विविध प्रकार खेळले जाऊ लागले आहेत.
पूर्वीपासून ग्रामीण भागात गावातील अनेकजण आपल्या कुटुंबात कुस्ती खेळण्यासाठी पैलवान तयार व्हावे यासाठी प्रयत्न करीत होते.
पैलवान असलेल्या घरचा कर्ता गावातील इज्जतदार माणूस म्हणून ओळखला जात होता. सध्या ग्रामीण भागातील पारंपरिक कुस्ती बरोबरच आधुनिक मॅटवरील कुस्ती प्रकार खेळले जाऊ लागले आहेत. सध्याही अनेकजण कुस्ती खेळण्यासाठी पैलवान तयार व्हावे त्यासाठी प्रयत्नशील असले तरी या खेळ प्रकारासाठी प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना बाहेर जावे लागत आहे. कुस्तीतील गावातील पैलवान आपल्या गावातच निर्माण व्हावे त्यासाठी तालुक्यात कुस्तीचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारले जावेत असे अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या आधुनिक कुस्तीसाठी लागणारे 'कुस्ती केंद्र' ग्रामीण भागात दिसत नाही. सांगोला तालुक्यात कुस्तीची आवड असणारे पैलवानांची संख्या अधिक असली तरी आधुनिक कुस्ती केंद्र नाहीत. अनेक कुस्ती खेळणारे पैलवान कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती प्रशिक्षणासाठी जात आहेत. तालुक्यातच आधुनिक 'कुस्ती केंद्र' निर्माण होऊन पैलवानांना आधुनिक प्रशिक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पैलवानांना पारंपारिक तांबड्या मातीतील वेगवेगळे डाव आम्ही शिकवीत असतो. अनेकांना कुस्ती शिकण्याची आवड असते परंतु त्यांच्याजवळ कुस्ती केंद्र नसल्यामुळे ते कुस्ती शिकू शकत नाही. तांबड्या मातीतील कुस्ती केंद्र गावोगावी निर्माण झाली पाहिजेत.
- बाळासो हाके, तांबड्या मातीतील प्रशिक्षक
प्राचीन व पारंपारिक कुस्ती खेळ जपणे गरजेचे आहे. आम्ही कुस्तीची आवड म्हणून आमच्या बामणी गावी तांबड्या व मॅटवरील या दोन्ही कुस्ती प्रकाराची सोय कुस्तीपटूंसाठी केली आहे.
पैलवानांच्या खाण्यापिण्याचे सोडून आम्ही कोणत्याही प्रकारची फी आकारीत नसून कुस्ती वरील प्रेमापोटी आम्ही हे सर्व प्रशिक्षण केंद्र निर्माण केले आहे.
हिम्मत साळुंखे, समन्वयक, कुस्ती प्रशिक्षण केंद्र, बामणी, सांगोला
आम्हाला बामणी येथील प्रशिक्षण केंद्रात खेळाची बारकावे समजून सांगितले जात आहेत. परंतु इतर भागातील व कुस्तीची आवड असणाऱ्या पैलवानांना त्यांच्या जवळच किंवा तालुक्याच्या ठिकाणी आधुनिक कुस्ती केंद्र निर्माण होणे गरजेचे आहे.
- परमेश्वर गाडे, पैलवान
ठळक बाबी
कुस्ती खेळाची पारंपरिक खेळ म्हणून ओळख
कुस्तीची जपणूक करणे काळाची गरज
इतर खेळांसाठी कुस्ती हा परिपूर्ण पाया मानला जातो
कुस्तीमधून चपळता, समतोलता, समन्वय वेग, सामर्थ्य, मानसिक कणखरता, मुख्य ताकद, एकाग्रता निर्माण होते
कुस्तीतील नवीन प्रकारासाठी प्रशिक्षकाची गरज
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आधुनिक कुस्ती केंद्र निर्माण होण्याची गरज
0 Comments