ब्रेकिंग न्यूज..गर्दी जमविण्याची जबाबदारी तहसीलदारांवर! मुख्यमंत्री, दोन्ही
उपमुख्यमंत्री १४ सप्टेंबरला सोलापुरात; लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी ४०० बसगाड्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे)
सोलापूर : महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता १४ सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान ४० हजारांपर्यंत लाभार्थींची उपस्थिती राहावी,
असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे.
जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ४०० बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत.
शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रूप येथील तहसीलदारांवर किमान पाच हजार
लाभार्थींना आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माढा येथील तहसीलदारांकडे दोन ते तीन हजार लाभार्थी आणण्याची जबाबदारी आहे.
विभागनिहाय जबाबदारी अशी...
बांधकाम विभाग : कार्यक्रमस्थळावरील नियोजनाची जबाबदारी
महापालिका : पार्कींग, वीज, पाणी, साफसफाई
शहर पोलिस : कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, वाहतुकीस अडथळा होणार नाही, त्यदृष्टीने पार्किंगची व्यवस्था
एसटी महामंडळ : महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे
पुरवठा विभाग : लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, मुबलक पाणी
मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख निश्चित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता.
पण, राष्ट्रपती दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेशोत्सवाला देखील ७ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला.
आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार तो कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे. कार्यक्रमाची वेळ पुढील पाच-सहा दिवसात निश्चित होणार आहे.
0 Comments