सोलापूर शहरात गुंठेवारीला परवानगी नाहीच! अधिकारी म्हणतात, मोजणी नकाशा व मालकी सिद्ध करणारी मूळ कागदपत्रेच नाहीत; महापालिकेने भूमिअभिलेख कार्यालयाला पाठविले 'हे' पत्र
सोलापूर : शहराचा विस्तार होत असताना हद्दवाढमध्ये खुले प्लॉट पडले आणि जागेच्या किमती भरमसाट वाढल्या.
पण, गुंठेवारीला परवानगी नसल्याने अनेकांनी जागा घेतली पण ते कागदोपत्री मालक झालेले नाहीत.
जागेच्या मोजणीचा नकाशा व मालकी सिद्ध करणारी पुरेशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सध्या गुंठेवारीला परवानगी मिळत नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील गावठाण भागात रहायला जागा नसल्याने हद्दवाढमध्ये प्लॉटिंग पडले आणि जागांचे भाव गगनाला भिडले. १९९०च्या दशकात लाखाच्या आत मिळणारा गुंठा आता १५ ते २० लाखांवर पोचला आहे.
पण, गुंठेवारी खरेदीला परवानगी नसल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. काहींनी स्टॅम्प किंवा नोटरी करून जागा घेतल्या आहेत पण त्यावर अद्याप मूळ मालकाचेच नाव आहे.
गुंठेवारीला परवानगी नसल्याने त्या जागेची खरेदी-विक्री होत नाही आणि त्यामुळे सध्याच्या मालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे मालकी सिद्ध होत नसल्याने बॅंकांकडून कर्जही मिळत नाही, अशी स्थिती आहे. सद्य:स्थितीत जागा घेऊन काही वर्षे होऊनही
ती जागा स्वत:च्या नावे न झाल्याच्या चिंतेत हजारो लोक आहेत. परंतु, त्या जागेच्या रीतसर मोजणीशिवाय व मूळ मालकी सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांशिवाय पुढे काहीच होणार नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
भूमिअभिलेख कार्यालयाला पत्र पाठवून मोजणीची मागणी केलीय
गुंठेवारीला परवानगी देण्यासाठी संबंधित जागेची मालकी सिद्ध करणारी पुरेशी कागदपत्रे आणि जागेचा मोजणी नकाशा जरुरी आहे. तो कोणाकडेही नसल्याने जागेची नेमकी मालकी सिद्ध होत नाही.
पुरेशी कागदपत्रे उपलब्ध असल्याने गुंठेवारीला परवानगी देणे शक्य होईल. भूमिअभिलेख कार्यालयाला आम्ही पत्र पाठवून मोजणी करून देण्यास सांगितले आहे.
- मनीष भिष्णूरकर, उपसंचालक, नगररचना, सोलापूर महापालिका
'यलो झोन'ला ले-आउटवरून प्लॉटिंगसाठी परवानगी
शहरातील यलो झोनमधील जमिनीतील प्लॉटिंगला महापालिकेकडून परवानगी मिळते.
पण, त्यासाठी क्षेत्राची मोजणी केल्याचा नकाशा व प्राथमिक ले-आउट तयार करून त्याठिकाणी संबंधित मालकाने स्वत:हून रस्ते (९ मीटर), ड्रेनेज, लाइट व पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
त्यानंतरच अंतिम ले-आउटला परवानगी दिली जाते आणि मग बांधकामासाठी परवानगी मिळते, असे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी सांगितले.
महापालिकेकडून भूमिअभिलेख कार्यालयास पत्र, पण...
महापालिकेने हद्दवाढ भागातील गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वच क्षेत्राची मोजणी स्वत: संपूर्ण शुल्क भरून भूमिअभिलेखकडून करून घेण्याचे नियोजन केले होते.
मोजणीनंतर ते शुल्क संबंधित मिळकतदारांकडून वसूल करण्याचे नियोजन केले होते. पण, त्यानुसार कार्यवाही झाली नाही. आता महापालिकेने भूमिअभिलेखला पत्र पाठवून गुंठेवारीची मोजणी करून देण्याबाबत कळविले आहे.
मात्र, त्या मिळकतींचे स्वाक्षरी व शिक्का असलेले ड्रॉईंग भूमिअभिलेख कार्यालयाने महापालिकेकडून मागितले आहे.
परंतु, यापूर्वी मोजणी न झाल्याने ते ड्रॉईंग महापालिकेकडे उपलब्ध नाही आणि त्यातच गुंठेवारीची प्रक्रिया अडकल्याची सद्य:स्थिती आहे.
0 Comments