वचनपूर्ती! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'या' तारखेला सोलापुरात मेळावा;
तीस हजार बहिणी येणार, जिल्ह्यातून ४६२ एसटी बसचे नियोजन
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा १ किंवा २ सप्टेंबर रोजी येथील होम मैदानावर नियोजित आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून ४६२ बसमधून ३० हजार महिलांना उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सोहळ्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून कामे करावीत, असा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या मेळाव्यासाठी किमान २५ ते ३० हजार महिला लाभार्थी संपूर्ण
जिल्हाभरातून आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या ४६२ एसटी गाड्यांची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने करावी.
या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी जेवण पाणी व अनुषंगिक व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थिती पाहता योग्य मंडप व अनुषंगिक व्यवस्था योग्य पद्धतीने करावी, अशी सूचना त्यांनी दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,
अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे आदी उपस्थित होते. यावेळी नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
0 Comments