मोठी बातमी..सांगोल्यातून अनिकेत की बाबासाहेब देशमुख? धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विधानानं चर्चांना उधाण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगोल्यात केलेल्या एका वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुखच निवडून येतील, असं विधान धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केलं आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बाबासाहेब देशमुख यांची सांगोल्यातून उमेदवारी पक्की समजली जात आहे.
त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांचे चुलत बंधू डॉ. अनिकेत देशमुख काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सांगोला मतदारसंघातून डॉ. अनिकेत देशमुख यांनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
स्व. गणपतराव देशमुख यांचं स्पप्न पूर्ण करण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढणार आहे,
असं त्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं आहे. तर, डॉ. बाबासाहेब देशमुख हेही गेली पाच वर्षांपासून विधानसभेची तयारी करीत आहेत.
त्यातच सांगोल्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटनेच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं.
यावेळी सोलापुरातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला. तसेच,
सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुखच निवडून येतील, हा शब्द देतो, असं धैर्यशील मोहिते-पाटील यांनी म्हटलं.
धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, "मला सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत-जास्त महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे. ती मी पार पाडेन.
सांगोल्यातूनही डॉ. बाबासाहेब देशमुख निवडून येतील, हा शब्द देतो. आता मी इथून रात्रीचा दिवस करेन. आणि
सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे आमदार कसे निवडून येतील, याच्यावर काम करेन."सहकारात एकहाती वर्चस्व...
गेल्या पाच वर्षांत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती,
सांगोला खरेदी विक्री संघ या सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करत सहकारात पक्षाचे एकहाती वर्चस्व राखले आहे.
पक्षीय संघटनेतही बाबासाहेबांचा शब्द महत्वाचा मानला जातो. अगदी शेकापचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यापासून
तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत बाबासाहेब देशमुख यांचा संपर्क राहिलेला आहे.
विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केली आहे, त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख
हे विधानसभा निवडणुकीसाठी 'शेकाप'च्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार मानले जातात.
स्पप्नपूर्तीसाठी विधानसभा लढणार...
दुसरीकडे डॉ. अनिकेत देशमुख यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. ( स्व. ) गणपतराव देशमुख (आबासाहेब)
यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे अनिकेत यांनी स्पष्ट केले आहे.
अनिकेत देशमुख कोणती भूमिका घेणार?
मात्र, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्यासाठी 'धनुष्यबाण' हाती घेतलं आहे.
खासदार मोहिते-पाटील यांच्या वक्तव्यामुळे 'शेकाप'कडूनडॉ. बाबासाहेब देशमुख यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांना तिकीट मिळाल्यास डॉ. अनिकेत देशमुख कोणती भूमिका घेणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
0 Comments