धक्कादायक प्रकार... सासरी नांदण्यास येत नाही म्हणून पत्नीवर ॲसिड हल्ला सोलापूर जिल्ह्यातील घटना..
सोलापूर : सासरी झालेल्या भांडणानंतर माहेरी जाऊन राहिलेल्या पत्नीच्या अंगावर ॲसिड ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी
नवऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी गावात भर दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
भारती हणमंत म्हमाणे (वय २७) असे या ॲसिड हल्ल्यात गंभीर भाजलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबावरून
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तिचा पती हणमंत महादेव म्हमाणे (वय ३५, रा. रामपूर, ता. दक्षिण सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
जखमी भारती हिचे माहेर हालहळ्ळी (अक्कलकोट) येथील असून तिचा विवाह रामपूर (दक्षिण सोलापूर) येथील हणमंत म्हमाणे याच्याबरोबर झाला होता.
परंतु सासरी सतत भांडण होत असल्यामुळे भारती ही सासर सोडून माहेरी येऊन राहात होती. त्याचा राग मनात धरून हणमंत हालहळ्ळी गावी भारती हिच्या माहेरी आला.
त्यावेळी घरात भारती एकटीच होती. पती हणमंत यास भारतीने पाणी पिण्यासाठी ग्लास दिला. तेव्हा त्याने भांडण काढत, तू सासरी का येत नाही ? माहेरीच का राहते,
असे विचारत सोबत प्लास्टिक बाटलीतून आणलेले ॲसिड भारती हिच्या संपूर्ण अंगावर ओतले. यात ती गंभीर भाजली. तिने आरडाओरड करू लागताच हणमंत हा पसार झाला.
0 Comments