धक्कादायक! उसने घेतलेले ४७ लाख बुडविण्यासाठी मित्राचा खून; पंधरा महिन्यानंतर घटनेचा उलगडा;
शहर गुन्हे शाखेची कामगिरी; संशयिताला ३ ऑगस्टपर्यंत कोठडी सांगोला तालुक्यातील घटना..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : व्यावसायिक भागीदार असलेल्या विशाल दत्तात्रय बनसोडे याने मित्र रमण सातप्पा साबळे याचा खून केल्याची बाब तब्बल १५ महिन्यानंतर उघड झाली आहे.
रमणकडून उसने घेतलेले ४७ लाख रूपये बुडविण्यासाठी विशाल बनसोडे याने मित्र रमणचा खून केल्याची बाब समोर आली आहे.
पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
शहरातील देगाव रोडवरील लक्ष्मी पेठेतील ३६ वर्षीय रमण सातप्पा साबळे ११ एप्रिल २०२३ रोजी बेपत्ता झाल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिसांत दाखल झाली होती.
त्याचवेळी सांगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनकढाळ गावाच्या शिवारात नाझरा मठ ते राजुरीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून कुटे मळ्याकडे
जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील नालाबंडिंगच्या बांधालगत लिंगे यांच्या शेतात जळालेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळला होता. कोणीतरी जीवे ठार मारून अंगावर काहीतरी ओतून पेटवून देऊन
पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना होता. अनकढाळ येथील बाळासाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरुन १४ एप्रिल २०२३ रोजी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड करीत होते. सांगोला पोलिसांना मयताची ओळखही झाली नव्हती. फौजदार चावडी पोलिसांनाही त्या बेपत्ता व्यक्तीचा तपास लागलेला नव्हता.
अशावेळी शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला आहे. सांगोला पोलिस तपास करीत आहेत.
गळा दाबून खून, त्यानंतर ओळखू नये म्हणून पेटवून दिले
सोलापूर शहर व ग्रामीणचे पोलिस तपास करीत असताना रमण साबळे याचा खून व्यावसायिक भागीदार विशाल दत्तात्रय बनसोडे (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याने केल्याची माहिती मिळाली.
बनसोडे याला पोलिसांनी कोल्हापुरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला आणि त्यातून रमणला मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केला.
त्यानंतर पेट्रोल व डिझेल आणून त्याचे शरीर ओळखू नये म्हणून जाळून टाकल्याची बाब समोर आली. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाने
संशयित आरोपीला सांगोला पोलिस ठण्यात हजर केले. त्यानंतर सांगोला पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्याला तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.
0 Comments