ब्रेकिंग न्यूज! उजनी धरणाबाबत मोठा निर्णय
सोलापूर :- जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल,
कृषी, धार्मिक व विनयार्ड पर्यटनाच्या अनुषंगाने विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे 250 कोटीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे.
त्यास मान्यता देण्यात येत असून यावर्षीच्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मान्यतेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे,
निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले
की पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण या आराखड्याला मान्यता देत असून यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल,
त्याबाबतचा मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करावा व याच अधिवेशनातील अंदाजपत्रकात या आराखड्यासाठी टोकन निधी उपलब्ध करून देण्याच्या
अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा रेल्वे व रस्त्याने जोडलेला आहे.
हा जिल्हा मंदिराचा जिल्हा असून येथे 94 पर्यटन स्थळे आहेत. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे अक्वॉटिक टुरिझम तसेच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते.
उजनी धरणाचे 90 किलोमीटर लांबीचे पात्र असून पात्राची रुंदी जवळपास सहा किलोमीटर आहे. येथे पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्र अनुभवयला मिळणार आहे.
सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटनात ही अग्रेसर असून पंढरपुरचे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर,
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल- हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचा ही धार्मिक पर्यटन स्थळ अंतर्गत विकास केला जात असून या ठिकाणी येणारे भाविकांची संख्या ही मोठी आहे.
त्याप्रमाणे च उजनी धरण परिसर व जिल्ह्यात कृषी पर्यटनाचा लाभ घेता येऊ शकतो. यासाठी होम स्टे बैलगाडी सफारी, बफेलो राईड, स्थानिक व पारंपारिक सण साजरे करणे, लोककला,
मासेमारी सह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येतील. माळशिरस व करमाळा परिसरात विनयार्ड पर्यटन निर्माण केले जाऊ शकते. यामध्ये विन यार्ड, मनोरंजन, बायसिकल राईड, चीज टेस्टिंग,
हॉटेल्स या सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. उजनीच्या सर्वेक्षणास 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. कृषी व विनयार्ड आराखडा 30 जुलै रोजी तयार होईल.
प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण 15 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे व त्यानंतर राज्य शिखर समिती ची मान्यता मिळून पुढील सहा महिन्याच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
0 Comments