ब्रेकिंग! अभिनेता गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार
प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
गोविंदाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तो लवकरच शिंदे गटात प्रवेश करेल, असेही बोलले जात आहे.
महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई ही जागा मिळणार आहे. तिथं ठाकरेंच्या शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना रिंगणात उतरवले आहे.
अमोल हे शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे गजानन कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यास पक्षातूनच विरोध आहे. त्यांनीही जवळपास निवडणुकीतून माघार घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर गोविंदाचे नाव पुढे आले आहे. गोविंदाने अलीकडेच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्याने उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान गोविंदासाठी निवडणूक नवीन नाही.
काही वर्षांपूर्वी त्याने उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदा अभिनय क्षेत्रातही चमकत होता.
त्या लोकप्रियतेच्या जोरावर त्याने नाईक यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र, खासदार झाल्यानंतर तो फारसा संसदेकडे फिरकला नव्हता. कालांतराने तो राजकारणातून बाजूला झाला.
0 Comments