खळबळ! गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 20 तुकडे केले अन्...
उत्तर प्रदेशातील अमरोह जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेतापूर गावात एका गर्भवती तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचे अमानुषपणे 20 तुकडे करण्यात आले होते.
तर, दोन मोठ्या पोत्यात मृतदेहाचे तुकडे भरुन रस्तालगतच्या झाडीत फेकून देण्यात आले होते. एका पोत्यात शरीराचा अर्धा हिस्सा तर पायापासूनचे शरीर दुसऱ्या पोत्यात भरण्यात आले होते.
हा सगळा भयंकर प्रकार बघून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत तरुणीची ओळख अद्याप पडली नसून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी परिसरातील नागरिकांना रस्त्यालगत असलेल्या झाडीत दोन गोणी सापडल्या. हे काहीतरी भलतंच असल्याचा संशय आल्यावर एकाने पुढे होऊन गोण्यांमध्ये काय आहे याची तपासणी केली.
मात्र, वेगळाच संशय आल्याने त्याने आजुबाजुच्या लोकांना आवाज दिला. त्यानंतरपरिसरातील आणखी काही लोकांनी येऊन त्या दोन्ही गोण्या उघडून पाहिल्या. गोण्या उघडून पाहताच नागरिकांना एकच धक्का बसला.
गोण्यात असलेले मृतदेह पाहून नागरिकांनी लगेचच पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाची तपासणी केली.
पोलिसांनी पाहिले असता युवतीच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करुन ते प्लास्टिकच्या पिशवीत भरुन गोण्यात टाकण्यात आले होते. जिथे मृतदेह सापडला ती जागा पोलिसांनी सील केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनौराहून बिजनौरला जाणाऱ्या रस्तामार्गापासून जवळपास 300 मीटर दूर हा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीने बांधून ठेवण्यात आले होते.
हा मृतदेह तरुणीचा असून ती गर्भवती आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर येणार आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एक दिवसांपूर्वीच तरुणीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुसरीकडे हत्या करुन या ठिकाणी मृतदेह फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. मात्र, त्यातून काहीच ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
रात्री 12 ते पहाटे 6च्या सुमारास मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले आहेत.
अद्याप तरुणीची ओळख पटलेली नाहीये. दुसऱ्या जिल्ह्यातील बेपत्ता तरुणींची माहिती गोळा करण्यात येत आहे. तसंच, मयत तरुणीच्या चेहऱ्याचा फोटो सगळीकडे पाठवण्यात आला आहे.


0 Comments