मोठी बातमी... बैलगाडा शर्यत, हुरडा पार्टीतून साखरपेरणी!
पंढरपूर-मंगवेढा, सांगोला, माढा मतदारसंघात वाहू लागले निवडणुकीचे वारे
पंढरपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. आमदारकीची स्वप्ने घेऊन कार्यरत असणारे नेते व पुढारी जोमाने कामाला लागले आहेत
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माढा, सांगोला मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रम, बैलगाडा शर्यत, तिळगुळ, हुरडा पार्टी, देवदर्शन कार्यक्रमातून
आमदारकीच्या निवडणुकीची पायाभरणी सुरू असून कार्यक्रमांच्या आडून प्रचाराची 'दंगल' सुरू असल्याचे दिसून येत आहे.मतदारसंघाचा विकास या नावाखाली सर्वच नेते आमदार होण्याची स्वप्ने पाहत असतात.
काही उमेदवार पाच वर्षांपासून कार्यरत असतात. तर काही उमेदवार निवडणुकीच्या तोंडावरच कार्यारत होतात. विद्यमान आमदार कार्यरत असताना विकास कामे होत असतात.
तर ही विकास कामे सुरू असताना काही मतदार व गट नाराज होत असल्याचे दिसून येत असते. विकासापासून दूर असणाऱ्या घटकाला न्याय देण्यासाठी इच्छुक उमेदवार पुढे सरसावलेले असतात. यातुनच पुढे आमदार तयार होतात.
सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे पुढील सत्ता आणण्यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न होत आहेत. तर प्रमुख विरोधी गट असलेल्या महाविकास आघाडीकडून सरकारच्या चुका शोधून सत्ता आणण्यासाठी धडपड सुरू आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फुटीमुळे माढा, सांगोला, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या सर्वांचा विचार करुन पक्षश्रेष्ठींना जागावाटपाचा गुंता सोडवावा लागणार आहे.
सांगोला मतदारसंघात शेकाप पक्षाकडून बाबासाहेब देशमुख आमदारकीसाठी तयारी करीत आहेत. ते पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. आबासाहेब केसरी या नावाने बैलगाडी शर्यती व
डाॅ. अनिकेत देशमुख यांच्या पुढाकारातुन गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तर माढा मतदारसंघात रणजितसिंह शिंदे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील नागरिकांना देवदर्शन घडवून आणले जात आहे.
मंगळवेढा येथे शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त परिसंवाद, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, ग्रंथ प्रकाशन सोहोळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इच्छुक नेत्यांनी फटकेबाजी
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील माजी सभापती वसंत देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते पाटील, आमदार शहाजी पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक,
महेश साठे, चेअमरन अभिजीत पाटील, माजी चेअरमन भगीरथ भालके, प्रणव परिचारक आदी नेत्यांची कार्यक्रमाला हजेरी होती. आमदारकीसाठी इच्छुक नेत्यांनी भाषणातून चांगलीच फटकेबाजी केली.
भेटीचा योग घडवून आणला
माजी आमदार कल्याणराव काळे यांनी भाळवणी (ता. पंढरपूर) याठिकाणी तिळगुळाचा कार्यक्रम घेऊन तालुक्यातील नेत्यांना भेटीचा योग घडवून आणला होता. यातून विठ्ठल परिवाराच्या एकीचे चित्र दिसून आले.
विठ्ठलचे चेअरमन अभिजिीत पाटील यांनीसुध्दा शिवमहापुरण कथेचे पंढरपूरात आयोजन करुन धार्मिक वातावरण तयार केले आहे. तर विठ्ठल कारखान्यावर २० जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत हुरडा पार्टींचे आयोजन करण्यात आले हाेते.
पक्षापेक्षा जनतेच्या संपर्कांतील नेतेच सरस
माढा, सांगोला, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील मतदार नेहमी जनतेसाठी उपलब्ध उमेदवारासच मतदान करीत असते. पक्षापेक्षा मतदारांकडून उमेदवाराला महत्व दिले आहे.
इतर गटाची ताकद व निवडणुकीतील प्रलोभणेसुध्दा मतदानांवर परिणाम करीत असतात. मात्र जनतेच्या संपर्कांतील व कामे करणारे उमेदवारच यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार होणार आहेत.
0 Comments