सांगोल्याच्या राजकिय साठमारीत मुख्याधिकार्यांची मात्र कोंडी :
प्रश्न उचलला बाबासाहेबांनी,कॅश केला दीपकआबांनी तर,हायजॅक केला शहाजीबापूंनी
एरव्ही जनतेच्या दैनंदिन समस्या व अडचणींकडे कानाडोळा करणार्या नेतेमंडळींना लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ आली की,मग मात्र हळुहळू जनता व जनतेचे प्रश्न आपलेसे वाटू लागतात.
अशावेळी सर्वसामान्य जनतेच्या छोट्या प्रश्नाचाही मोठा इश्यू करुन त्याचे खापर संबंधित खात्याच्या अधिकार्यावर फोडून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न या नौटंकी नेतेमंडळींकडून केला जातो.असाच कांहीसा प्रकार
सांगोला शहरातील स्वच्छतेच्या व सफाई कामगारांच्या रोजगाराच्या अनुशंगाने शहरातील नागरिकांना अनुभवायला मिळाला. विषय होता,सफाई कामगारांच्या रोजगाराचा व सांगोला शहरातील स्वच्छतेचा.पण,त्यात गंमत अशी झाली
की,हा प्रश्न उचलला शेकापचे युवा नेते डाॅ.बाबासाहेबांनी,त्याला कॅश केला राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबांनी तर,हायजॅक केला विद्यमान आमदार शहाजीबापूंनी.
सांगोला नगरपरिषदेअंतर्गत आरोग्य विभागाकडील तब्बल १३० सफाई कामगारांच्या टेंडरची मुदत संपल्यामुळे सफाई कर्मचार्यांविना आठवडाभरापासून
सांगोला शहरात सर्वत्र घाणीचे व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याची बाब शेकापचे युवा नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांचे निदर्शनास आणून
दिल्याची बातमी दुसर्या दिवशी सकाळी स्थानिक प्रसिध्दी माध्यमांमधून वाचायला मिळाल्याबरोबर, त्या प्रश्नावर मुख्याधिकार्यांनी कांही निर्णय घेण्याअगोदरच,
तत्परता दाखवून राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी दुपारी तातडीने मुख्याधिकारी व सर्व सफाई कामगार यांची एकत्रित बैठक बोलावून
त्यांच्यामध्ये समेट घडवून आणला आणि “पुढील टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे त्याच कामगारांना कामावर घेवून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय” सदर बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत ठरलेल्या निर्णयाची चाहूल विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचे समर्थकांना लागताच,(दुपारच्या दीपकआबांच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कशा पध्दतीने करायची ?
यावर आणखीन नियोजनच करत बसलेल्या) मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांना व मुदत संपल्याने कामावरुन कमी झालेल्या सफाई कर्मचार्यांना सायंकाळच्या
सुमारास आमदार शहाजीबापू यांच्या संपर्क कार्यालयातून बोलावणे आले आणि तिथेही पुन्हा त्याच विषयावर चर्चेचा फार्स आणि “पुढील टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे
त्याच कामगारांना कामावर घेवून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्याचा” तोच निर्णय आमदार शहाजीबापूंच्या उपस्थितीत घेण्यात आला.
शेवटी,विद्यमान आमदार मी असताना,मतदार संघातील एखाद्या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार मलाच असायला हवा असे म्हणत,
शेकापच्या डाॅ.बाबासाहेबांनी उचललेला शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न, जरी तत्परता दाखवत
बैठक बोलावून दीपकआबांनी कॅश केला असला तरी,आख्खी शिवसेनाच हायजॅक करुन राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंच्या गटात राहून,
हायजॅक करण्याच्या कलेत तरबेज झालेल्या आमदार शहाजीबापूंना सांगोला शहराची ही छोटीसी समस्या व त्यावरचा उपाय हायजॅक करायला किती वेळ लागणार ?
एकंदरीत,एकच विषय एकाच दिवसात आपापल्या परिने हाताळून सांगोल्याच्या आमदारकीचे दावेदार असणार्या या तिन्ही नेतेमंडळींनी शहरातील
नागरिकांच्या प्रश्नाविषयी जी तत्परता दाखवली,तीच तत्परता ही फक्त निवडणुकीच्या तोंडावरच न दाखवता ती कायम दाखवावी,अशी चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.
सांगोल्याच्या राजकिय साठमारीत मुख्याधिकार्यांची मात्र कोंडी :
सांगोला नगरपरिषदेवर सध्या प्रशासकराज असून मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांचीच शासनाने कांही दिवसांपूर्वी “प्रशासक” म्हणून नियुक्ती केली आहे.
नगरपरिषदेच्या कामकाजाच्या अनुशंगाने कोणताही सकारात्मक निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत.परंतु, किती जरी झाले तरी, राजकारण्यांपुढे प्रशासनाला झुकावेच लागते,हे सांगायला नको.
सांगोला शहरातील स्वच्छता व सफाई कर्मचार्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याची मागणी शेकापचे युवानेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्याधिकारी यांचेकडे केल्यानंतर त्यावर तोडगा काढण्याच्या विचारात असतानाच डाॅ.सुधीर गवळी यांना माजी आमदार दीपकआबांनी बैठकीला बोलावले.
त्यांच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या मुख्याधिकारी डाॅ.गवळी यांना पुन्हा त्याच विषयावर आम.शहाजीबापूंनी आयोजित केलेल्या बैठकीस बोलावले जाते आणि तोच निर्णय जाहीर करण्यास सूचविण्यात येते.
एकंदरीत,सध्या एकतर नगरपरिषदेवर कुणाचीच सत्ता नाही. म्हणूनच शासनाने मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
वरील विषयावर ते जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: निर्णय घेवू शकतात.
पण शेवटी,सत्तेपुढे शहाणपण चालत नाही,म्हणतात तेच खरे असून सांगोल्याच्या या राजकिय साठमारीत मुख्याधिकार्यांची मात्र कोंडीच होत असल्याचे यावरुन दिसून येते.


0 Comments