google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार शहाजीबापूंनी मोहिते पाटलांना डिवचले; 'कृष्णा भीमा स्थिरीकरण'साठी मोहिते पाटलांनी नव्हे; निंबाळकरांनी प्रयत्न केले

Breaking News

आमदार शहाजीबापूंनी मोहिते पाटलांना डिवचले; 'कृष्णा भीमा स्थिरीकरण'साठी मोहिते पाटलांनी नव्हे; निंबाळकरांनी प्रयत्न केले

 आमदार शहाजीबापूंनी मोहिते पाटलांना डिवचले; 'कृष्णा भीमा स्थिरीकरण'साठी


मोहिते पाटलांनी नव्हे; निंबाळकरांनी प्रयत्न केले

 भीमा स्थिरीकरण योजना मोहिते पाटील यांनी केली होती, तर ती पूर्ण का करण्यात आली नाही, असा सवाल करत या योजनेसाठी मोहिते पाटील यांनी नव्हे;

 तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले, असा दावा शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी केला.शहाजी पाटील यांच्या या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अकलूजचे मोहिते पाटील‌ यांच्यात कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या श्रेयावरून वाद सुरू आहे. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी आता या वादात उडी घेतली आहे. 

आमदार शहाजी पाटलांच्या या नव्या दाव्यामुळे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या श्रेयावरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात राजकारण पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील शिवसेनेचे उमेदवार; राऊतांच्या संकेतामुळे महाआघाडीत खळबळ!

दुष्काळी सोलापूर, सांगली, सातारा आणि मराठवाड्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा प्रस्ताव तयार करून तो सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला होता.

 दरम्यानच्या काळात ही योजना अत्यंत खर्चिक आहे. ती प्रत्यक्षात येणे कठीण आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते.

पवारांच्या नकारात्मक विचारानंतरही या योजनेसाठी मोहिते पाटील यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. मोहिते पाटील यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 या योजनेला निधी देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. 

असे असताना कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसाठी मोहिते पाटील यांनी नव्हे; तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले आहेत, असा दावा आमदार पाटील यांनी केला आहे.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे काम मोहिते पाटील यांनी केलं होतं, तर ते काम पूर्ण का झालं नाही असा सवाल आमदार पाटील यांनी केला. ही योजना पूर्ण होण्यासाठी खासदार निंबाळकर यांनी गेली‌ वर्षभर सातत्याने प्रयत्न केले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत खासदार निंबाळकर यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मोहिते पाटील यांनी आता निंबाळकरांच्या या प्रयत्नांना साथ द्यावी, असं सूचक वक्तव्य ही आमदार पाटील यांनी केले आहे.

कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निधी देऊन ही योजना पूर्ण करावी, यासाठी दुष्काळी भागातील सर्व आमदार मागणी करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments