मायबाप सरकार, आम्ही जगावे की मरावे? दुष्काळ, अवकाळीची मदत,
पीकविम्याचा २५ टक्के अग्रिमही मिळेना; ५४ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
सोलापूर : दुष्काळ, अवकाळी, शेतमालांचे गडगडलेले दर, कांदा निर्यातबंदी अशा संकटांने बळिराजा हतबल झाला आहे.
अशा चिंताजनक परिस्थितीत राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांमधील अंदाजे ४२ लाख शेतकऱ्यांना काहीच मदत मिळालेली नाही.
दुसरीकडे पाच लाखांवर शेतकऱ्यांना पीकविम्याचा २५ टक्के अग्रिमही तर अवकाळीने बाधित झालेल्या अंदाजे साडेसात लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही.
पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील ४० तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० टक्के सुद्धा पाऊस झाला नाही.
केंद्र सरकारच्या निकषांनुसार झालेल्या सॅटेलाईट सर्व्हेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा व बार्शी या पाच
तालुक्यांसह ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. केंद्रीय पथकाने पाहणी देखील केली. मात्र, एकाही शेतकऱ्याला दुष्काळाची मदत मिळालेली नाही.
तत्पूर्वी, सोलापूरसह राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा तडाखा बसला. त्यात पाच लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोलापूर जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांसाठी ५९ कोटी १५ लाखांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारला सादर केला.
पण, अजूनही राज्यातील कोणालाच अवकाळीची भरपाई मिळालेली नाही. पीकविम्यापोटी दुष्काळाने बाधित शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मिळावा, अशी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढून तीन महिने झाले.
तरीदेखील, सोलापूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
...तरी कांदा निर्यातबंदीचा निर्णय
१) पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पांचा साठा तळाशी, जमिनीची पाणीपातळी एक मीटरने खालावली. शेतमालाला समाधानकारक दर नाही, उसाची एकरकमी एफआरपी मिळत नाही. गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याची स्थिती
२) ४० तालुक्यांसह एक हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करून दोन महिने झाले. तरीसुद्धा ना ४० तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना दमडीचीही मदत मिळाली, ना उर्वरित महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफी झाली
३) अवकाळीचा सोलापूरसह राज्यातील पाच लाख हेक्टरला तडाखा बसला. तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले, मात्र एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही
४) पावसाळ्यात २१ दिवसांचा खंड पडल्याने सोलापूरसह २० जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश दिले. तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ३०.५० कोटी मिळालेच नाहीत.
५) दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या मागील शेती कर्जाची वसुली थांबविली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकांनी रब्बीच्या कर्जवाटपात हात आखडता घेतल्याची सोलापूरसह राज्यभरात स्थिती
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती
दुष्काळी मदतीची प्रतीक्षा
४१.७३ लाख शेतकरी
अवकाळीने बाधित शेतकरी
७.४९ लाख
पीकविम्याचा अग्रिम न मिळालेले
४.८३ लाख
मदतीच्या प्रतीक्षेतील एकूण शेतकरी
५४.०५ लाख
0 Comments