google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळे ग्रामसभा भरताहेत केवळ ठरावासाठीच...! गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं

Breaking News

कोळे ग्रामसभा भरताहेत केवळ ठरावासाठीच...! गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं

कोळे ग्रामसभा भरताहेत केवळ ठरावासाठीच...!


गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं 

कोळे विशेष प्रतिनिधी:-गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं 

 काल मंगळवार दिनांक 31/10/2023 रोजी कोळा ग्रामपंचायतची ग्रामसभा होती. पण पुरेशा कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करावी लागली. ग्रामसभेला फक्त 35 ग्रामस्थ उपस्थित होते.

 किमान 100 ग्रामस्थ उपस्थित असल्याशिवाय कोरम पुरा होत नाही. ग्रामसभा घेताही  येत नाही. आत्तापर्यंत *पाच वेळा कोरम अभावी ग्रामसभा रद्द करण्याची नामुष्की  कोळा ग्रामपंचायतवर आली आहे.

 त्यानंतर पुढची तारीख जाहीर करून कितीही ग्रामस्थ असले तरी ग्रामसभा घेता येते. अगदी पाच- दहा जण असतील तरीही.आजपर्यत वार्ड सभा कुठल्याही वार्डामध्ये घेतली गेली नाही.

सुमारे 18000 लोकसंख्या असलेल्या गावात 100 लोक सुद्धा ग्रामसभेला येत नसतील तर याचे नक्की कारण काय ? याचा विचार करण्याची खरच वेळ आली आहे. काही वर्षांपूर्वी ग्रामसभेला इतके लोक यायचे की ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये बसायला जागा नसायची.

 त्यामुळे ग्रामसभा कोळेकर महाराज मठामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये घेतलेल्या गावाने पाहिलेल्या आहेत मग आता हे लोक कुठे गेले ? ग्रामसभेकडे लोकांनी पाठ का फिरवली ? गावाचे महत्त्वाचे निर्णय ग्रामसभेत होतात

 हे लोकांना ग्रामस्थांना माहित नाही का ? ग्रामसभेला आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या निधीचे नियोजन ग्रामसभेत होते हे ग्रामस्थांना माहित नाही का ?  सर्व केलेल्या खर्चाचा लेखाजोगा ग्रामसभेत ग्रामस्थांसमोर मांडला जातो

 हे ग्रामस्थांना माहित नाही का ? तर वरील सर्व प्रश्नांचे उत्तर होय असेच आहे.गावातील ग्रामस्थ हुशार आहेत,जागृत आहेत, प्रश्न विचारणारे आहेत, गावाच्या विकासासाठी काही सूचना, काही बदल सांगणारे आहेत.

मग शेवटी प्रश्न उरतो की असे असून सुद्धा ग्रामसभेला ग्रामस्थ का येत नाहीत ? पूर्णपणे ग्रामस्थांनी ग्रामसभेकडे पाठ का फिरवली. याची कारणे काय आहेत. याला जबाबदार कोण ?  यावर उपाय काय ? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जबाबदार,

 हुशार व तरुण अभ्यासू ग्रामस्थांनी स्वतः शोधली पाहिजे. प्रत्येकाला वाटते की बघेल कोणीतरी !  विचारेल कोणीतरी ! पाहिल कोणीतरी ! करेल कोणीतरी ! ह्याच विचारसरणीने गावाचं वाटोळे झालंय आणि  

सत्ताधारी व विरोधक लापाट झाले आहेत त्यामुळे ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर मिळेना. फक्त टोलवाटोलवी सुरू झाली. गांभीर्याने विचार केला तर गावासमोर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न एकत्र केले तर एक मोठा डोंगर तयार होईल. 

एवढे प्रश्न आहेत,अडचणी आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, आपले गाव स्वच्छ असावे, सुंदर असावे , टापटीप असावे, सुशोभित असावे, शिस्तबद्ध असावे असे प्रत्येक नागरिकाला वाटते आणि तसे करण्यासाठी काही मदत, 

सहकार्य करण्याची पण त्याची तयारी असते. पण आपल्याकडे नियोजन, दूरदृष्टी यांचा पूर्णपणे दुष्काळ आहे. तो जेव्हा संपेल तोच खरा गावाच्या दृष्टीने भाग्याचा दिवस असेल. *आत्तापर्यंत गावाचा हिताचे शेकडो ठराव झाले पण अंमलबजावणी एकाही ठरावाची झाली नाही.

ग्रामसभेत यायचं, आतडी तुटूपर्यंत बोलायचं,सत्ताधाऱ्यांनी मान खाली घालून बसायचं, विरोधकांनी कशी जिरली म्हणून हसायचं, हे असंच वर्षानुवर्षे चालत आले आहे .*हल्ली लोकांना हेही कळेना झाले की सत्ताधारी कोण व विरोधक कोण?  

आलेला निधी एकत्र बसून कसा लाटायचा व संपवायचा यावर मात्र सगळ्यांचे एकमत लगेच होते आणि गावाच्या विकासाचा एखादा मुद्दा निघाला की गडी फाटी ओढून तयार .......नेत्यांच्या अशा दुटप्पी  वागण्याला जनता वैतागून गेली आहे. पण बोलणार कोणाला ? 

ग्रामसभेत विरोधक व सत्ताधारी एकमेकांच्या अंगावर जातात पण गावात चौकात आले की तेच एकत्र मिळून चहा पितात मावा खातात आणि आपण कसं लोकांना गंडवलं ह्या अविर्भावात रस्ते लाल करतात (की स्वतःची लाल करतात.)

 सत्ताधारी व विरोधक कोणीही असो गावातील महत्त्वाचे निर्णय घेणारी काही मंडळी ठराविक आहेत. ठेकेदार पण तेच आहेत. विरोधक पण तेच आहेत. सत्ताधारी पण तेच आहेत. खाणारे पण तेच आहेत. खाऊ न देणारे पण तेच आहेत.

दर दोन वर्षांनी गटारे, पाईपलाईन व  रस्ते खराब करणारे पण तेच आहेत. नंतर नवीन गटार,रस्ते, पाईपलाईन बांधणीचा ठेका घेणारे तेच आहेत.रस्ते, गटारी व पाईपलाईन एक वर्षात कशी फुटेल.खराब होईल याची तरतूद करणारे पण तेच आहेत. 

आणि पुन्हा त्याचा ठेका घेणारे पण तेच आहेत .गावात किती विकास निधी आणला म्हणून ऊर बडवून  सांगणारे पण तेच आहेत. आणि हे सर्व लोकांना माहीत आहे. म्हणून लोकांनी ग्रामसभेला पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

शंकर आलदर ( सत्यम )

         9689280080

Post a Comment

0 Comments