संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, मुलाने जन्मदात्या आईलाच संपवलं; खळबळजनक घटना
चारित्र्यावर संशय घेत एका नराधम मुलाने जन्मदात्या आईची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरात रविवारी (२० ऑगस्ट ) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनीता सुनील घोघरा (वय ३६ वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून वैभव घोघरा (वय १८ वर्ष) असं आरोपी मुलाचे नावं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही वसई तालुक्यातील देपिवली गावातील ग्रामपंचायत सदस्य होती.
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली-देपिवली ग्रामपंचायत मधून मृत महिला सदस्य म्हणून निवडून आली होती. दरम्यान, मृत महिला वालिव परिसरात नोकरीला जात होती. आपल्या आईचे एका पुरूषासोबत प्रेमसंबंध आहे, असा संशय महिलेच्या मुलाला होता.
यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपी वैभव याने घरात झोपलेल्या आईवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. घटनेनंतर तो पसार झाला.
दरम्यान, काही वेळानंतर वैभव याचे वडील घरी आले असता, त्यांना आपली पत्नी जखमी अवस्थेत आढळून आली.त्यांनी तातडीने उपचारासाठी पत्नीला भिवंडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सदर घटनेची नोंद मांडवी पोलिसात होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत मृत महिलेच्या मुलाची चौकशी केली असता, मी आईची हत्या केल्याचे त्याने कबुल केले. सदर आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे मांडवी पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले आहे.


0 Comments